
ओडिशाच्या बालासोरमध्ये एक अजबच प्रकरण पोलीस ठाण्यात येऊन पोहोचले आहे. लग्नसोहळ्यामध्ये जोरात डीजे वाजवल्याने पोल्ट्रीमधील 63 कोंबडय़ा मेल्याचा दावा करत एका पोल्ट्री फार्म मालकाने शेजाऱयाविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. लग्नाच्या वरातीत कानाचे पडदे फाटतील एवढय़ा जोरजोरात डीजे वाजवला होता. तसेच आतिषबाजीदेखील जोरात करण्यात आली होती. या आवाजामुळे एवढय़ा मोठय़ा प्रमाणात कोंबडय़ा मेल्याचा आरोप पोल्ट्री मालकाने केला आहे.
पंडागराडी गावातील रहिवासी पोल्ट्री फार्मचा मालक रंजित परिदा यांनी त्यांच्या शेजारी रामचंद्र परिदा याच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार रविवारी रात्री लग्नाची वरात पोल्ट्री फार्मजवळून गेली होती. या वरातीमध्ये डीजे वाजवला होता. आवाजाने पोल्ट्री फार्ममधील कोंबडय़ा फडफडू लागल्या, सैरावैरा पळू लागल्या. रंजित यांनी अनेकवेळा डीजेचा आवाज कमी करण्याची विनंती केली होती, मात्र तरीही डीजे वाजतच राहिला.
काही वेळ्याने कोंबडय़ा जमिनीवर निपचित पडल्या. मालकाने त्यांना जिवंत करण्याचा प्रयत्न केला, पण तो निष्फळ ठरला. मालक रंजित यांनी स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱयाकडून तपासणी करून घेतली. त्यांनी निदान केले की, मोठय़ा आवाजाचा धक्का पक्ष्यांना बसला आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.
22 वर्षीय रंजित अभियांत्रिकी पदवीधर असून त्याने सहकारी बँकेकडून 2 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. त्या पैशांमधून त्याने स्वतःचे पोल्ट्री फार्म सुरू केले होते. सुरुवातीला रंजितने शेजारी राहणाऱया रामचंद्रकडून नुकसानभरपाई मागितली होती, मात्र त्याने भरपाई देण्यास नकार दिला.



























































