चंद्रपूरात वाघ-मानव संघर्षचा आलेख वाढताच, सात वर्षात 64 वाघांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभिषेक भटपल्लीवार । चंद्रपुर

चंद्रपूर जिल्ह्यात 2014 साली 111 वाघ होते. त्यात वाढ होऊन 2020 मध्ये त्यांची संख्या 246 हून अधिक झाली आहे. तर 2021 अखेर पर्यंत वाघांची संख्या 300 पर्यंत वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. असे असले तरी वाघांच्या मृत्यूमुळे चिंता व्यक्त केली जात आहे. गेल्या सात वर्षात 64 वाघांचा मृत्यू झाला असून शिकारीमुळे 15 वाघांचा मृत्यू झाला आहे.

जंगलात गावकऱ्यांचा वाढता हस्तक्षेप, गरिबी, बेरोजगारी, जंगलतोड, अतिक्रमण, विकासकामे आणि राजकीय हस्तक्षेपामुळे वन्यजीव-मानव संघर्षात वाढ होत असून मानवावरील हल्यांमध्ये आणि मृत्यूंच्या प्रमाणात सातत्याने सतत वाढ होत आहे.

2006 पासून सुरु झालेला वाघ मानव संघर्ष वर्षागणिक वाढतच आहे. त्यामुळे गेल्या सात वर्षात चंद्रपूर जिल्ह्यात 64 वाघांचा मृत्यू झाला असून 122 मनुष्यांचा बळी गेला आहे.

व्याघ्र दर्शन देणारा ताडोबा व्याघ्र प्रकल्प जगप्रसिद्ध असून पर्यटक वाघ पाहण्यासाठी इथे मोठ्या प्रमाणावर येतात. उत्तम अधिवास आणि वन्यजीव क्षेत्रात संरक्षणामुळे वाघ व वन्यजीवांची संख्या वाढत आहे तर दुसरीकडे वाढती लोकसंख्या, विकास, रोजगारीचा अभाव यामुळे ग्रामीण लोकांची जंगलावरील अवलंबित्व वाढली आहे.

जवळ-जवळ 800 गाव जंगलात किंवा परिसरात आहेत, त्यामुळे वाढत्या वाघ-वन्यजीवांचा त्रास शेतकरी आणी नागरीकांना होतो आहे तशीच समस्या वन्यजीवाची सुद्धा आहे. जिल्ह्यात वेकोलीच्या खाणी आणि अनेक उद्योग आहेत त्यामुळे वाघ -वन्यजीवांचे अधिवास, भ्रमण मार्ग बाधित झाले असल्यामुळे वन्यजीव-वाघ-मानव संघर्षात वाढ झाली आहे.

केवळ चंद्रपूर शहराजवळ 21 वाघ आहेत, चंद्रपूर प्रादेशिक जंगलात 30 पिलांच्या वाघीन, 37 बछडे आणि 41 लहान वयस्क वाघ आहेत. यावरून वाघांच्या संख्येत किती वाढ झाली हे लक्षात येते. वाघांच्या वाढीमुळेच ताडोबातील वाघ विविध मार्गे महाराष्ट्रभर जात आहे. त्यातूनही त्या ठिकाणी वाघ-मानव संघर्ष उद्भवत आहेत.

संरक्षित जंगलापेक्षा असंरक्षित जंगलात वाघांची संख्या वाढत आहे. जंगलात, शेतात, कोळसा खाणीत, थर्मल पॉवर स्टेशन, औद्योगिक आणि ग्रामीण भागात सुद्धा वाघांनी आपले तात्पुरते अधिवास बनविलेले आहे.

वाघ-मानव संघर्षात वाघांचा मृत्यू

2014 ते 2021 या सात वर्षात नैसर्गिक, अपघात आणि शिकार अशा घटनांमधून एकूण 64 वाघांचा मृत्यू झाला आहे. त्यात नैसर्गिक कारणामुळे 38, अपघातात 11 तर शिकारीत 15 वाघांचा मृत्यू झाल्याचे निदर्शनात येते. या घटना पाहता 2019 आणि 2020 या दोन वर्षात शिकारी मुळे 10 वाघांचा मृत्यू झाला ही घटना या संघर्षाचे वाढते स्वरूप विषद करते.

हा संघर्ष कमी करण्यासाठी 26 जुलै रोजी नागपूर येथील अतिरिक्त मुख्य वनसंरक्षक, वन्यजीव यांनी जिल्ह्यातील सर्व वनाधिकारी आणि तज्ञांची वेबिनार द्वारा बैठक घेतली आणि सुचना मागविल्या. हा संघर्ष कमी करण्यासाठी उपाय योजना- वाढते वाघ-बिबट-अस्वल आणि वन्यजीवांची संख्या, हल्यात मानवी मृत्यू, शेतीचे नुकसान, जंगलतोड आणि मानवाचा जंगलातील हस्तक्षेपामुळे वाघ-मानव संघर्ष वाढतो आहे. वाघ, वन्यजीव आणि मानव याचे अस्तित्व महत्वाचे असून त्यांच्यात सहजीवन साधता येईल काय यावर बैठकीत चिंतन झाले पाहिजे. त्यासाठी दीर्घकालीन आणि लघु कालीन उपाय योजना करणे अत्यावश्यक आहे.

हल्ले करणाऱ्या आणि अगदी गावाजवळ असलेल्या वाघ, बिबटे, अस्वल यांना त्वरित पकडण्याची परवानगी मिळणे आणि योग्य अभयारण्यात सोडणे, लोकांना जंगलात जाण्यापासून परावृत्त करणे, जंगलात चराईवर नियंत्रण, वन विभागाचे नियमित निरिक्षण, स्थानिक नेते आनि गावकऱ्याचे संवर्धनासाठी मन वळविणे, जिल्हा परिषद आणि वन विभागातर्फे ग्रामीण भागात गरिबी दूर करणे तसेच विकासाच्या विविध योजना राबवविणे अश्या अनेक उपाय योजना राबविल्यास वाघ-मानव संघर्ष निश्चित कमी करता येईल.