
61 वर्षीय ज्येष्ठ व्यावसायिकाला शेअर मार्केट गुंतवणूक प्रकरणात तब्बल 10 कोटी 98 लाख रुपयांचा आर्थिक गंडा घातल्या प्रकरणात दक्षिण सायबर पोलिसांनी सात जणांना पकडले. यूपी, बिहार, ओडिशा, हरयाणा आणि महाराष्ट्रातून त्यांना उचलण्यात आले. या आरोपींच्या बँक खात्यात फसवणुकीचे पैसे वळते झाले होते.
होशनाक वाजिफदार (61) हे व्यावसायिक असून चर्चगेट परिसरात राहतात. वाजिफदार यांना अज्ञात व्यक्तीने संपर्क साधून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा कमवाल अशी बतावणी केली होती. त्या आमिषाला बळी पडत वाजिफदार यांनी गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. 29 डिसेंबर 2025 ते 17 जानेवारी 2026 या कालावधीत सायबर गुन्हेगारांनी वाजिफदार यांना गुंतवणूक करण्यास शिताफीने भाग पाडून त्यांची 10 कोटी 98 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केली. आपल्याला फसवल्याचे लक्षात येताच वाजिफदार यांनी दक्षिण सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल करून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळी पथके तयार करून आरोपींचा शोध सुरू करण्यात आला. या गुह्यात सहभागी असलेल्या पहिल्या स्तरातील खातेधारकाचा शोध घेत पथकाने यूपी, बिहार, ओडिशा, हरयाणा व महाराष्ट्रातून पुंवरलाल येळे (57), आदर्शसेन आनंद (27), अर्मत्यसेन आनंद (23), सुनील गुप्ता, रसराज बाऊरी (32), संजय सिंग (51) आणि खिरोद साहू अशा सात जणांना पकडले.
दोन कोटी 13 लाखांची रोकड गोठवली
तब्बल दोन कोटी 60 लाख रुपये अटक आरोपींच्या बँक खात्यात वळते करण्यात आले होते. एनसीआरपीच्या तक्रारीनुसार या आरोपींच्या खात्यात एपूण 13 कोटी 77 लाख 94 हजार रुपये जमा झाल्याचे समोर आले आहे. हे आरोपी पहिल्या स्तरातील खातेधारक असून फसवणुकीची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली होती. विशेष म्हणजे, तक्रारदारांनी गोल्डन अवरमध्ये 1930 हेल्पलाईनवर तक्रार केल्याने दोन कोटी 13 लाखांची रक्कम गोठविण्यात यश आले.




























































