
कर्नाटकातील बंगळुरूमध्ये एका भीषण रस्ते अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये तमिळनाडूमधील द्रविड मुनेत्र कळघम पक्षाचे आमदार प्रकाश वाय. यांचा मुलगा करुणासागर आणि सून बिंदू यांचा मृत्यू झाला आहे. या दोघांसोबत गाडीतून जात असलेले 5 जणही दगावले आहेत. कोरमंगला भागात ही दुर्घटना घडली असून करुणासागर यांची ऑडी Q3 ही गाडी पंजाब नॅशनल बँकेच्या शाखेच्या इमारतीला धडकली होती. या गाडीतून प्रवास करणाऱ्या अन्य लोकांचीही ओळख पटली असून त्यांची नावे इशिता, धनुष, अक्षय, गोयल आणि रोहीत असल्याचे कळाले आहे. या सगळ्यांची वये 20 ते 30 च्या आसपास असल्याचं कळतं आहे.
31 ऑगस्टच्या पहाटे हा अपघात झाला असून या गाडीमध्ये 5 लोकांसाठीच बसण्याची व्यवस्था असताना 7 जण प्रवास करत होते. हे सगळे जण बंगळुरूला पिकनिकसाठी आले होते आणि होसूर या त्यांच्या मूळ ठिकाणी परतत होते. अपघातानंतर समोरच्या हॉटेलमधील लोकांनी तसेच स्थानिकांनी गाडीतील लोकांना बाहेर काढले आणि आदूगोडी पोलिसांना याबाबतची माहिती दिली. जेव्हा लोकांना गाडीतून बाहेर काढलं जात होतं, तेव्हा गाडीच्या इंजिनमधून धूर येत होता. गाडीला आग लागण्याची भीती असल्याने लोकांनी पाणी ओतून आग लागणार नाही याची काळजी घेतली असे एका पोलीस कर्मचाऱ्याने सांगितले आहे.




























































