मजुरांवर काळाचा घाला, आठ महिन्याच्या चिमुरड्यासह 7 ठार

724

मध्य प्रदेशातील सेंधवा तालुक्यातून महाराष्ट्रात रोजगार मिळवण्यासाठी निघालेल्या मजुरांवर शुक्रवारी मध्यरात्री काळाने घाला घातला. हे मजूर ज्या पिक-अप व्हॅनने निघाले होते ती व्हॅन धुळे-चाळीसगाव रस्त्यावर बोरी नदीच्या पुलावरुन नदीत कोसळली. या अपघातात 7 जण जागीच ठार झाले तर 19 जण जखमी झाले. त्यातील 5 जणांची प्रकृती गंभीर आहे. अपघातावेळी झालेल्या गाडीच्या मोठय़ा आवाजाने तसेच प्रवाश्यांच्या किंकाळ्यांनी बोरी नदीचा परिसर अक्षरशः शहारला.

मध्य प्रदेशातील सेंधवा तालुक्यातील धवल्यागिर येथील मोलमजुरी करणाऱया कुटुंबातील 30 जण पिकअप व्हॅनने धाराशिव जिल्हय़ातील अंदोरा येथे जात होते. भरधाव निघालेली ही व्हॅन रात्री साडेबाराच्या सुमारास धुळे-चाळीसगाव रस्त्यावरील बोरी नदीच्या पुलावर आली असता चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी नदीत कोसळली. या दुर्घटनेत पिकअप व्हॅनमधून प्रवास करणाऱयांपैकी सात जणांचा मृत्यू झाला. तर इतर 19 जण कमी-अधिक प्रमाणात जखमी झाले आहेत. त्यात चार पुरुष, तीन महिला, सहा मुले आणि सहा मुली आहेत. सर्व जखमींना भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातास कारणीभूत ठरलेला वाहन चालक सागर आंबोरे याच्या विरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातातील मृतांचे देह धुळे शहरातील शवविच्छेदनगृहात आणण्यात आले. त्या ठिकाणी अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख राजू भुजबळ, तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांनी भेट दिली. मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन केले.

ग्रामस्थांचा रास्ता रोको
बोरी नदीवरील पूल खिळखिळा झाला आहे. शिवाय रस्त्यात ठिकठिकाणी खड्डे असून रस्ता अरुंद आहे. यापूर्वी देखील या परिसरात अनेक वाहन चालकांचे अपघात झाले. अपघातांमध्ये चूक नसताना अनेकांना प्राण गमवावे लागले. शासन आणि बांधकाम विभाग अजून किती जणांचे बळी घेणार आहे? असा प्रश्न विचारत विंचूरच्या ग्रामस्थांनी अपघात झाल्यानंतर सकाळी रास्ता रोको आंदोलन केले. तातडीने रस्ता सुस्थितीत आणावा नाही तर आंदोलन अधिक तीव्र होईल असा इशारा ग्रामस्थांनी दिला.

मृतांची नावे
– मेघाराम आर्य (23), लालसिंग अंबू पावरा (2), रितेश आर्य (8 महिने), जिनाबाई पावरा (13), रविना आर्या (5), करण बारेला (3), धरमसिंग बारेला (5),
गंभीर जखमी
– रेलबाई बारेला, गुड्डीबाई बारेला, संध्या बारेला, राजेश बारेला, गुरू बारेला.

पिकअप व्हॅन मध्येमजुर कुटुंबातील 30 सदस्य बसले होते. ही पिकअप व्हॅन सागर तांबोरे याच्या मालकीची असून तोच पिकअप व्हॅन चालवित होता. सागर तांबोरे हा रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करीत प्रचंड वेगाने पिकअप व्हॅन चालवित होता. शिरुड चौफुली पार केल्यानंतर वाहनाचा वेग जास्त असताना त्याला वेग कमी करण्याबाबत सांगितले, पण तरीही त्याने वाहनाचा वेग कमी केला नाही. – लेदाराम आर्य, तक्रारदार

आपली प्रतिक्रिया द्या