
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप 2019 ची उत्सुकता सर्वांनाच लागलेली असून 30 मे पासून खऱ्या अर्थाने या क्रिकेटच्या कुंभमेळ्याला सुरुवात होणार आहे. यंदाच्या वर्ल्डकप मध्ये 10 संघ एकमेकांशी झुंज देताना दिसून येणार आहेत. तसेच या वर्ल्डकपमध्ये 7 नवीन नियम लागू होणार आहेत. चला पाहूया कोणते आहेत हे 7 नवीन नियम…
1. गोलंदाजाने ‘नो बॉल’ टाकल्यावर ‘बाय’ किंवा ‘लेग बाय’द्वारे मिळालेल्या धावा अतिरिक्त धावांमध्ये जोडल्या जात होत्या. मात्र यंदा ‘नो बॉल’द्वारे मिळणाऱ्या अतिरिक्त धावा या वेगवेगळ्या ग्राह्य धरल्या जाणार आहेत. म्हणजेच गोलंदाजाने ‘नो बॉल’ टाकल्यानंतरच्या ‘बाय’ किंवा ‘लेग बाय’ अशा धावांची विभागणी करण्यात येईल.
2. यष्टीचित किंवा धाव काढताना बाद होण्याच्या भितीपोटी अनेकदा खेळाडू सूर मारुन रेषेवर बॅट ठेवतात. बॅट रेषेवर असल्याने खेळाडू नियमानुसार नाबाद ठरत होता. मात्र आयसीसीच्या नव्या नियमावलीनुसार, खेळाडूची बॅट ‘ऑन द लाईन’वर असेल तर त्याला बाद ठरवले जाणार आहे.
3. एक दिवसीय क्रिकेटमध्ये गोलंदाजांना दोन बाऊन्स टाकण्याची संधी होती, परंतु यात आता बदल करण्यात आले आहेत. विश्वचषकादरम्यान चेंडू दोनदा बाऊन्स होऊन फलंदाजाकडे गेल्यास तो नो बॉल देण्यात येणार आहे.
4. पंचांचा निर्णय न पटल्यामुळे अनेकदा खेळाडू भर मैदानात पंचांसोबत हुज्जत घातलाना दिसतात, तसेच पंचांना अपशब्दही वापतात. परंतु विश्वचषकादरम्यान पंचांशी वाद घालणाऱ्या खेळाडूंना पंच थेट मैदानाबाहेर काढू शकतात. पंचांशी वाद घालणाऱ्या खेळाडूंना आयसीसीच्या ‘कोड ऑफ कंडक्ट’ च्या 1.3 नियमाद्वारे दोषी ठरवून पंच सामना सुरु असताना बाहेर काढू शकतात.
5. सामना सुरू असताना दोन्ही संघ डीआरएस वापर करत रिव्ह्यू मागतात. यावेळी कधीकधी पंचानी दिलेला निर्णय अंतिम ठेवला जातो. यामुळे संघांकडे असलेला रिव्ह्यू वाया जातो. मात्र यंदाच्या विश्वचषकादरम्यान संघाने डीआरएसचा वापर करत रिव्ह्यू मागितला, त्यावेळीही पंचांचा रिव्ह्यू कायम राहिल्यास संघांकडच्या रिव्ह्यूची संख्या कमी होणार नाही.
6. विश्वचषकादरम्यान बॅटची लांबी आणि जाडी किती असावी याचेही मोजमाप ठरवण्यात आले आहे. नव्या नियमानुसार, बॅटची रुंदी 108 मि.मी आणि जाडी 67 मि.मी असावी तसेच बॅटची कडा 40 मि.मीपेक्षा जास्त नसावी असे फलंदाजांना सांगण्यात आले आहे. तसेच बॅटच्या मापाबाबत पंचांना संशय आल्यास, ते याची तपासणी करू शकतात.
7. फलंदाजाने मारलेला फटका क्षेत्ररक्षकाच्या हेल्मेटला लागून उडाला आणि तो दुसऱ्या क्षेत्ररक्षकाने झेलल्यास फलंदाजाला बाद ठरवले जाईल. मात्र ‘हँडल द बॉल’च्या स्थितीमध्ये फलंदाजाला नाबाद ठरवले जाईल.



























































