
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिका कर्मचाऱ्यांनी मुख्यालय आणि कार्यालयांत 100 टक्के उपस्थित राहण्याचा निर्णय मागे घेण्यात आला असून आता 75 टक्के उपस्थितीला परवानगी देण्यात आली आहे. पालिकेने शुक्रवारी याबाबतचा सुधारित निर्णय जारी केला आहे.
कोरोनाला आळा घालण्यासाठी मनुष्यबळ अपुरे पडत असल्यामुळे पालिका कर्मचार्यांची उपस्थिती 100 टक्के करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पालिकेच्या आदेशानंतर कर्मचारी आणि अधिकारी 100 टक्के उपस्थित राहू लागले. मात्र, त्यामुळे कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आवश्यक असलेल्या सोशल डिस्टनसिंगचा वापर करण्यात अडचणी येऊ लागल्या. त्याचबरोबर कर्मचार्यांची होणारी गैरसोय, गर्दी आणि सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना, ‘बेस्ट’ कर्मचारी सेनेसह कर्मचारी संघटनांनी 100 टक्के उपस्थितीबाबत पालिका प्रशासनाने पुनर्विचार करावा अशी मागणी केली होती. त्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने कर्मचाऱ्यांची उपस्थिती 75 टक्के असावी, असे सुधारित आदेश काढले आहेत.
25 टक्के कर्मचारी कोरोना संबंधित कामांसाठी
अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वगळून पालिका कार्यालयात उपस्थित असलेल्या 75 टक्के कर्मचाऱ्यांपैकी 25 टक्के कर्मचाऱ्यांची नेमणूक कोरोना हाताळण्याच्या कामासाठी केली जाणार आहे. कंटेनमेंट झोन, कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांना शोधून काढणे, क्वॉरंटाईन सेंटरमधील कामे, पालिका रुग्णालयांतील बेड, ऑक्सिजन तसेच इतर उपकरणे यांची देखरेख करणे आणि पावसाळापूर्व नालेसफाई, पर्जन्य आणि जलवाहिन्यांची कामे यासाठी या कर्मचाऱ्यांची नेमणूक केली जाणार आहे. दरम्यान, मधुमेह, उच्च रक्तदाब, डायलिसिस असे दीर्घ स्वरूपाचे आजार आणि दिव्यागांना 75 टक्के उपस्थितीतून वगळण्यात आले आहे.


























































