
दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी 15 लाख 75 हजार 752 विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यांकन शाळांकडून शिक्षण मंडळाला मिळाले. त्यांपैकी 15 लाख 74 हजार 994 विद्यार्थी दहावी पास झाले आहेत. तर उर्वरित 758 विद्यार्थ्यांना नापास म्हणायचे की या विद्यार्थ्यांच्या निकालाचे शिक्षण मंडळ काय करणार, याविषयी संभ्रमावस्था आहे.
उत्तीर्णतेच्या कक्षेत न आलेल्या या 758 विद्यार्थ्यांच्या निकालाविषयी माहिती देताना शिक्षण मंडळाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. या विद्यार्थ्यांना नववीतील गुणांचा फटका बसल्याने ते दहावीत नापास झाल्याची शक्यता शिक्षण मंडळाकडून वर्तविण्यात येत आहे. हे विद्यार्थी नववीत नापास झाले किंवा काठावर पास झाले आहेत. तरीही त्यांना दहावीत प्रवेश देण्यात आला. या विद्यार्थ्यांच्या निकालावर नववीच्या निकालाचा परिणाम झाला. त्यांचे नववीतील गुण अत्यंत कमी असल्याने त्यांना मंडळाने उत्तीर्ण करण्याच्या यादीतून वगळले असून या विद्यार्थ्यांची माहिती घेऊन त्यावर स्वतंत्ररीत्या कार्यवाही केली जाणार असल्याचे शिक्षण मंडळातून सांगण्यात आले. त्याचबरोबर परीक्षेसाठी नोंदणी केली पण अंतर्गत मूल्यमापन पूर्ण न झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या 54 इतकी आहे. परीक्षेसाठी नोंदणी केल्यानंतर यातील काही विद्यार्थ्यांचा शाळेशी संपर्क तुटला, तर काही विद्यार्थी स्थलांतरित झाले अशी शक्यता शिक्षण मंडळाकडून वर्तविण्यात आली आहे.





























































