
अनेकजण आपल्यानंतर आपल्या वारसांसाठी मोठी संपत्ती मागे ठेवतात. मात्र, एका प्राणीप्रेमीने चक्क आपल्या पाळीव कुत्र्यासाठी 36 कोटींची संपत्ती ठेवली आहे. अमेरिकेतील आठ वर्षांचा हा पाळीव कुत्रा आता 36 कोटींचा मालक झाला आहे. ही एखादी रंजक घटना वाटते. मात्र, ही घटना अमेरिकेत प्रत्यक्षात घडली आहे.
अमेरिकेतील टेनेसी शहरात बिल डोरिस यांनी आपल्या मृत्यूनंतर आपला पाळीव कुत्रा ‘लूलू’ याच्या नावावर तब्बल 5 मिलियन डॉलरची (36 कोटी 29 लाख 55 हजार 250 रुपये) संपत्ती ठेवली आहे. डोरिस यांचे लूलू या त्यांच्या पाळीव कुत्र्यावर खूप प्रेम होते. ते त्याची मुलांप्रमाणे काळजी घेत होते. आपल्या मृत्यूनंतर त्याची चांगल्याप्रकारे देखरेख व्हावी, या हेतूने त्यांनी त्याच्या नावावर एवढी मोठी संपत्ती ठेवली आहे.
डोरिस यांनी आपले लूलूवर खूप प्रेम असल्याचे मृत्यूपूर्वी म्हटले आहे. तसेच मृत्यूपत्र करून त्यात 36 कोटींची संपत्ती त्याच्या नावावर केली आहे. आपल्या मृत्यूनंतर ही संपत्ती ट्रस्टला हस्तांतरीत करण्यात यावी, जेणेकरून लूलूची चांगल्या प्रकारे देखभाल करता येईल, असे त्यांनी मृत्यूपत्रात नमूद केले आहे.
लूलूची देखभाल करण्यासाठी त्यांची त्यांची मैत्रीण मार्था बर्टन यांची निवड केली आहे. लूलूची चांगल्या प्रकारे देखभाल करण्यासाठी मार्था यांना ट्रस्टमधील जमा निधीतून मासिक खर्चासाठी पैसे देण्यात यावेत, असेही त्यांनी त्यात नमूद केले आहे. डोरिसचे लूलूवर खूप प्रेम होते, असे मार्था यांनी सांगितले. लूलूची चांगल्याप्रकारे देखभाल करण्यात यावी, अशीच डोरिस यांची शेवटची इच्छा होती, असे मार्था म्हणाल्या.
डोरिस यांनी लूलूच्या नावावर मोठी संपत्ती ठेवली आहे. मात्र, नवीन मालक त्याच्या मर्जीप्रमाणे हे पैसे वापरू शकत नाही. लूलूच्या देखभालीसाठी महिन्याच्या खर्चाला लागतील तेवढीच रक्कम त्याला ट्रस्टकडून मिळणार आहे. आपण लूलूची चांगल्याप्रकारे देखभाल करून डोरिस यांची शेवटची इच्छा पूर्ण करणार असल्याचे मार्था यांनी सांगितले.
डोरिस यांची एकूण संपत्ती किती आहे, याबाबतची नेमकी माहिती अद्याप मिळालेली नाही. त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात चल आणि अचल संपत्ती असल्याचे त्यांच्या मित्रपरिवाराने सांगितले. त्यांनी मृत्यूपत्रात म्हटल्याप्रमाणे लूलूसाठी 36 कोटींची संपत्ती ट्रस्टला हस्तांतरीत करण्यात येणार आहे. एखाद्या पाळीव कुत्र्यासाठी एवढी मोठी संपत्ती मागे ठेवण्याची ही पहिलीच घटना असवी.




























































