बेडसाठी 80 वर्षांची आजी 8 तास रस्त्यावर, शिवसेनेमुळे वाचले प्राण

पाय फ्रॅक्चर झालेल्या एका आजीबाईंचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर रूग्णालयात बेड मिळवण्यासाठी तिला अॅम्ब्युलन्समध्ये तब्बल आठ तास झोपून राहावे लागल्याची घटना डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रूग्णालयाच्या आवारात घडली. याबाबतचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शिवसेनेचे शहरप्रमुख राजेश मोरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन या आजीबाईला तत्काळ एका खासगी रूग्णालयात बेड मिळवून दिला. शिवसेनेमुळे उपचार सुरू होऊन तिचे प्राण वाचले आहेत.

डोंबिवलीतील सांगर्ली येथे राहणाऱ्या जोहराबाई शेख 80 वर्षीय वृध्देचा पाय फ्रॅक्चर झाल्याने त्यांना एमआयडीसीतील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तिची कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने तिला दुसऱ्या रूग्णालयात हलवा,असे सांगण्यात आले. त्यानुसार त्या आजीचे कुटूंबीय तिच्यासह अॅम्ब्युलन्समधून शास्त्रीनगर रूग्णालयात पोहचले. परंतु तेथे बेड भरलेले असल्याचे सांगत दुसरीकडे नेण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानंतर अॅम्ब्युलन्स नेहरू रोडसमोरील उद्यानाजवळ उभी करण्यात आली.एका नागरिकाने आजीची बेडसाठी होणारी फरफट व्हिडीओद्वारे सोशल मिडियात व्हायरल केली. हा व्हिडीओ शहरप्रमुख रोजेश मोरे यांच्यामार्फंत पोहोचताच त्यांच्यासह शाखाप्रमुख संदीप नाईक,अजय घरत घटनास्थळी पोहचले. आजीबाईला धीर देऊन तिच्या अॅम्बुलन्समधील ऑक्सिजन संपण्याआधीच राजेश मोरे यांनी तिला एका खासगी रूग्णालयात बेड मिळवून दिला.

आपली प्रतिक्रिया द्या