80 वर्षाच्या महिलेचे हात तोंड बांधून लुटले, सव्वाचार लाखांचा ऐवज लंपास 

घरात असलेल्या 80 वर्षीय महिलेचे हात आणि तोंड कापडाने बांधून सव्वाचार लाख रुपयांचा ऐवज लुटून नेल्याची धक्कादायक घटना पुणे शहरातील पाषाण येथील पंचवटी सोसायटीत घडली आहे. तसेच या महिलेचा केअर टेकर असलेल्या तरुणाच्या पायावर कोयत्याने आणि काठीने मारहाण करून जखमी करण्यात आले.

याप्रकरणी या महिलेने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी चार जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि केअर टेकर पाषाण येथील पंचवटी सोसायटीत राहतात.

बुधवारी सायंकाळी साडेसात ते पावणेआठच्या सुमारास चार जणांनी त्यांच्या  घरात जबरदस्तीने प्रवेश केला. चोरट्यांनी केअर टेकरला जखमी करून ज्येष्ठ महिलेचे हात आणि तोंड कापडाने बांधले. त्यानंतर चोरट्यांनी बेडरूमच्या कपाटातील 25 हजार रुपये रोख आणि सोन्याचे दागिने असा एकूम सव्वाचार लाख रुपयांचा ऐवज त्यांनी लुटून नेला. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक संतोष कोळी तपास करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या