
दुकाने-आस्थापनांवर मराठी पाटय़ा न लावणाऱयांविरोधात पालिकेने विशेष मोहीम हाती घेतली आहे. यानुसार दुकाने व आस्थापने विभागाने आज दिवसभरात केलेल्या कारवाईत 3112 दुकानांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 3031 ठिकाणी मराठी पाटय़ा लावण्यात आल्याचे आढळले, तर 82 ठिकाणी मराठी पाटी नसल्याचे आढळले. यानुसार संबंधित 82 दुकाने-आस्थापनांना पालिकेने नोटीस बजावली. या कारवाईनुसार नोटीसमध्ये दिलेल्या कालावधीत मराठी पाटी लावली नाही तर दुकान बंद करण्याची कारवाई पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे. कायदेशीर प्रक्रिया पार पाडून ही कारवाई करण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.





























































