स्वतःसाठी नाही तर पुढच्या पिढीसाठी! मोदी सरकारविरोधात 82 वर्षीय आजीबाई मैदानात

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

जिद्द आणि महत्वाकांक्षेला वयाचे बंधन नसते हे खरे आहे. दिल्लीतील मजदूर किसान संघर्ष रॅलीला फक्त 200 रुपये कनवटीला बांधून पालघरहून दिल्ली गाठणाऱ्या तुलसी बाबू भगत या 82 वर्षीय आजीबाईंनी त्याचा प्रत्यय सर्वाना आणून दिला आहे. अंगणवाडी सहायिका असलेल्या वयोवृद्ध तुलसी यांनी आमचे आयुष्य आता कितीसे उरली. मी मोठ्या जिकिरीचे स्थितीत दिल्लीत आली आहे ती स्वतःसाठी नाही तर आपल्या पुढच्या पिढीचे अस्तित्व टिकावे यासाठी असे सांगितले. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार श्रीमंतांची तळी उचलून त्यांना अधिक श्रीमंत करतेय. महिला, कामगार आणि शेतकरी वर्गाचे सोयरसुतकच या सरकारला नाही असाही हल्ला त्यांनी चढवला.

देशभरातील एक लाख शेतकरी व कामगार मोदी सरकारच्या शेतकरी आणि कामगारांबाबतच्या उदासीन धोरणाचा निषेध करण्यासाठी मोठ्या रॅलीने राजधानी दिल्लीत आले आहेत. महिलांवरील वाढते अत्याचार, बेरोजगारी, भूकबळी आणि महागाई रोखण्यात अपयशी ठरलेल्या केंद्रातील भाजप सरकारचा निषेध करण्यासाठी मजदूर किसान संघर्ष रॅलीने या धरण्याचे आयोजन केले आहे. त्यात 23 राज्यांच्या शेतकरी आणि कामगारांनी सहभाग घेतला आहे.

गरिबांना मदतीचा डांगोरा पिटणाऱ्या सरकारचा पर्दाफाश
आपली व्यथा मांडताना 82 वर्षीय तुलसी भगत म्हणाल्या, मोठ -मोठ्या जाहिराती देऊन गरिबांना मदत केल्याचा डांगोरा पिटणाऱ्या केंद्रातील भाजप सरकारच्या खोटारडेपणाचा आणि जुलमी वृत्तीने शेतकरी व कामगार यांची पिळवणूक करण्याच्या धोरणाचा निषेध करण्यासाठी मी एवढ्या दूर प्रवास करून आलेय. गेले चार महिने अंगणवाडीच्या मानधनही न मिळाल्याने माझ्याकडे एक फुटकी कवडीही नव्हती. मी शेजाऱ्यांकडून 200 रुपये उसने घेऊन दिल्लीत रॅलीसाठी आले आहे. माझ्यासोबत जमानी रामा वळवी (78) आणि मरचू मालाजी भीमरा (78) या माझ्या जेष्ठ मैत्रिणीही आहेत. त्यांनाही त्यांचे अंगणवाडीचे 4 महिन्यांचे मानधन मिळालेले नाही. त्यांना मीच सोबत दिल्लीला आणले आहे. आम्हा गरिबांच्या मूलभूत गरजा सरकारने पूर्ण केल्या असत्या तर आम्ही तंगडे ताणत एवढे 1500 किमी अंतर कापून कशाला आलो असतो असा संतप्त सवालही तुलसीबाई यांनी केला.

माझ्यामागे कुणीही नाही, पण पुढच्या पिढीचे भले व्हावे !
माझ्यामागे कुणी वारस नाही.पण आम्हा गोरगरिबांच्या पुढच्या पिढ्यांचे तरी सरकारकडून भले व्हावे याच इच्छेने दूरवर दिल्लीला आलो आहोत, असे सांगून तुलसी म्हणाल्या, गरिबांचा पैसे लुटून श्रीमंत उद्योगपतींच्या तिजोऱ्या भरणाऱ्या केंद्रातील सरकारचा विरोध मी शेवटच्या श्वासापर्यंत करणार आहे. हे सरकार मुके आणि बहिरे असून त्याला गरिबांचे हाल कळतच नाहीत याचे मोठे दुःख आहे.