
देशातील आघाडीची विमान कंपनी असलेल्या इंडिगोच्या विमानांच्या वेळापत्रकात आणि सेवांमध्ये आलेल्या प्रचंड गोंधळामुळे प्रवाशांचे हाल सुरूच आहेत. अनेक विमानांना झालेला विलंब, उड्डाणे रद्द होणे आणि प्रवाशांना मिळणारी वाईट वागणूक यामुळे कंपनीचे संकट अधिक गडद झाले आहे. आता तर जवळपास 829 संतप्त प्रवाशांनी एकत्र येऊन भरपाईसाठी न्यायालयात खटला दाखल करण्याची तयारी केली आहे.
इंडिगोच्या खराब सेवांमुळे झालेल्या नुकसानीसाठी हे 829 प्रवासी एकत्र येत आहेत आणि लवकरच ते कंपनीविरुद्ध कोर्टात भरपाईसाठी खटला भरतील, असा मोठा दावा हवाई वाहतूक क्षेत्रातील तज्ञ आणि ग्राहक संरक्षण वकील असणाऱ्या डॉ. सुधीर शुक्ला यांनी केला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून इंडिगो विमानांचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहे. अनेक तास विलंबाने उड्डाण करणे, ऐनवेळी विमाने रद्द करणे आणि प्रवाशांना बोर्डिंगपासून वंचित ठेवणे यांसारख्या घटना नित्याच्या झाल्या आहेत. प्रवाशांना योग्य माहिती दिली जात नाही आणि ग्राहक सेवा विभागाकडूनही सहकार्य मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी आहेत. प्रवाशांना विमानातील खराब वागणूक आणि मनमानी रद्द झालेल्या उड्डाणांमुळे झालेल्या त्रासाची भरपाई मिळावी, यासाठी हा सामूहिक खटला दाखल केला जाणार आहे.



























































