
सामना प्रतिनिधी, रत्नागिरी
जून महिन्यात शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना तसे नवीन पुस्तक, वह्या गणवेशाचे आकर्षण असते तसेच वर्षभरात शाळेला कोणत्या सणांच्या किती सुट्ट्या आहेत याकडे विद्यार्थी वर्गाचे लक्ष असते. छात्रबोधिनी हातात पडली की, विद्यार्थी सुट्ट्यांचे पान प्रथम पाहतात. पुढील शैक्षणिक वर्षात रविवार वगळता 84 दिवस सुट्टी मिळणार आहे. त्याशिवाय सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय? हे बडबडगीत म्हणायला विद्यार्थी तयार आहेत.
शैक्षणिक वर्ष 2019-20 साठीच्या प्राथमिक शाळांच्या सुट्ट्या जाहीर झाल्या आहेत. वर्षभराच्या एकूण 366 दिवसांपैकी 230 दिवस प्रत्यक्ष कामाचे राहणार आहेत. तर 52 रविवार आणि 84 दिवसांच्या इतर सुट्ट्या मिळून 136 दिवस शाळा बंद राहणार आहेत. दि. 1 जून 2019 ते 31 मे 2020 असा या शैक्षणिक वर्षाचा कालावधी राहणार आहे. यामध्ये रमजान ईद, स्वातंत्र्य दिन, नागपंचमी, पारसी नववर्ष दिन, बकरी ईद, गोपाळकाला, गणेशोत्सव, गांधी जयंती, दसरा, दिवाळी सुट्टी, ईद ए मिलाद, गुरुनानक जयंती, डॉ. बाबसाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन, नाताळ, मकर संक्रांत, प्रजासत्ताक दिन, शिवजयंती, महाशिवरात्र, धुलिवंदन, महावीर जयंती, गुड फ्रायडे, महाराष्ट्र दिन आणि उन्हाळी सुट्टी याशिवाय दोन स्थानिक सुट्ट्यांचा समावेश आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार राज्यातील प्राथमिक शाळांसाठी वर्षात 220 दिवस आणि माध्यमिक शाळांसाठी 230 दिवस काम होणं बंधनकारक आहेत.




























































