
इराण आणि इस्रायलमध्ये पेटलेल्या युद्धामुळे आखाती देशांमधील परिस्थिती अत्यंत गंभीर बनली असून, याचा थेट फटका पुण्यातील विद्यार्थ्यांना बसला आहे. पुण्यातील प्रसिद्ध इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस स्टडीजचे (ISBS) ८४ विद्यार्थी आणि ४ शिक्षक सध्या दुबईमध्ये अडकले आहेत. हवाई हद्द बंद झाल्यामुळे आणि विमान सेवा विस्कळीत झाल्याने हे सर्व विद्यार्थी मायदेशी परतू शकलेले नाहीत, ज्यामुळे पुण्यातील त्यांच्या पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
हे सर्व विद्यार्थी शैक्षणिक सहलीसाठी दुबईला गेले होते. पाच दिवसांचा हा दौरा संपवून ४० विद्यार्थी शनिवारी तर उर्वरित ४४ विद्यार्थी रविवारी पुण्यात परतणार होते. मात्र इराणने केलेल्या हल्ल्यांनंतर निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे दुबईसह अनेक देशांनी आपली हवाई हद्द तात्पुरती बंद केली. परिणामी या विद्यार्थ्यांची नियोजित विमाने रद्द करण्यात आली आणि ते तिथेच अडकून पडले.
दरम्यान, विद्यार्थी अडकल्याची बातमी समोर आल्यानंतर पालकांमध्ये घबराट निर्माण झाली होती. मात्र इंदिरा कॉलेजचे डीन डॉ. जनार्दन पवार यांनी तातडीने स्पष्टीकरण देत सर्व विद्यार्थी सुरक्षित असल्याचे सांगितले आहे. हे सर्व ८४ विद्यार्थी आणि शिक्षक दुबईतील एका हॉटेलमध्ये सुखरूप असून, त्यांच्या निवास आणि भोजनाची चोख व्यवस्था करण्यात आली आहे. कॉलेज प्रशासनाने यासंदर्भात परराष्ट्र मंत्रालय आणि नागरी विमान वाहतूक मंत्रालयाशी संपर्क साधला असून विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
VIDEO | Pune, Maharashtra: On 84 MBA students of Indira School of Business Studies stranded in Dubai due to the closure of airspace amid West Asia conflict, University Dean Dr Janardhan Pawar says, “84 of our students are stranded there. Every year, we take our MBA students to… pic.twitter.com/jjOZAVUQVe
— Press Trust of India (@PTI_News) March 1, 2026

























































