पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेत जिल्ह्यातून फक्त 84 हजार अर्ज प्राप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । अलिबाग

सरकारने अर्थसंकल्पात अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजने अंतर्गत वर्षाला सहा हजार अनुदान देण्याची योजना लागू केली आहे. जिल्ह्यातील सव्वा चार लाख शेतकऱ्यांना ही योजना लागू झाली आहे. मात्र जिल्ह्यातील फक्त 84 हजार शेतकऱ्यांनी योजनेसाठी तहसीलदार कार्यालयात अर्ज सादर केले आहेत. उर्वरित साडेतीन लाख शेतकऱ्यांनी अद्यापही आपले अर्ज सादर केलेले नाहीत. तरी 15 फेब्रुवारीपर्यत योजना प्राप्त करण्यासाठी अर्ज सादर करावे असे आवाहन अलिबाग तहसीलदार सचिन शेजाळ यांनी केले आहे.

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही देशात 1 फेब्रुवारी पासून लागू करण्यात आली. तर राज्यामार्फत 4 फेब्रुवारी रोजी कृषी विभागाकडून शासन निर्णय काढण्यात आला होता. पाच एकर पेक्षा कमी शेती असलेल्या शेतकऱ्यांना ही योजना लागू केली आहे. योजनेसाठी शेतकऱ्यांनी 15 फेब्रुवारी पर्यंत आपली माहिती संकलित करून तहसीलदार कार्यालयात देणे गरजेचे आहे. जिल्ह्यात 1983 गावांची संख्या असून पाच एकर पेक्षा कमी क्षेत्र असलेले सव्वा चार लाख अल्प व अत्यल्प शेतकरी कुटूंबाची संख्या आहे. जिल्ह्यात 12 फेब्रुवारीपर्यत 1330 गावाची माहिती संकलित केली असून आतापर्यत फक्त 84 हजार 764 शेतकरी कुटूंबाची माहिती जिल्ह्यातील तहसीलदार कार्यालयाकडे प्राप्त झालेली आहे. या योजनेसाठी शेतकऱ्यांना आधारकार्ड, बँक खाते व संमती पत्रे अशी तीन कागदपत्रे तलाठी, कृषी सहायक किंवा ग्रामसेवक यांच्याकडे सादर करावयाची आहेत. तर या योजनेत शासकीय नोकर, लोकप्रतिनिधी, आयकर भरणारे, डॉक्टर, वकील, इंजिनियर, सीए, आर्किटेक, या व्यक्ती ही योजना प्राप्त करण्यास अपात्र आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील साडेतीन लाख राहिलेल्या शेतकरी कुटूंबानी आपली कागदपत्रे 15 फेब्रुवारपर्यत संबंधित अधिकाऱ्याकडे देऊन या योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन तहसीलदार सचिन शेजाळ यांनी केले आहे.