
खेड शहरातील इमारतींच्या स्ट्रक्चरल ऑडिट दरम्यान धक्कादायक माहिती उघड झाली आहे. शहरात एक दोन नव्हे तर तब्बल 85 इमारती धोकादायक असून त्यापैकी 20 इमारती अतिधोकादायक असल्याचे स्पष्ट झाले आहे. धोकादायक इमारतीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांच्या जीवाला धोका असल्याने या रहिवाशांनी तात्काळ अन्य ठिकाणी स्थलांतर करावे, असे आवाहन खेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी ढोरजकर यांनी केले असून संबंधितांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत.
खेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी ढोरजकर यांनी दिलेल्या माहितीनुसार खेड शहरातील अनेक इमारती या जुनाट झाल्या असल्याने धोकादायक झाल्या आहेत. साठे मोहल्ला येथील एस. एम. रेसिडेन्सी ही इमारत अतिशय धोकादायक झाली असून या इमारतीचे संरक्षक भिंतही काहीशी ढसळल्याचे लक्षात आल्यावर आम्ही तात्काळ त्या ठिकाणी गेलो. या इमारतीत ए आणि बी अशा दोन विंग असून बी विंग मध्ये असलेल्या 9 सदनिकांपैकी 6 सदनिकांमध्ये रहिवाशी होते. या सर्व रहिवाशांच्या जीवाला धोका असल्याने आम्ही तेथील रहिवाशांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याची विनंती केली. त्या रहिवाशांनीही आम्हाला सहकार्य करत स्थलांतरित होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आम्ही त्या इमारतीला राहण्यायोग्य नसल्याचे जाहीर करत त्या इमारतीवर धोकादायक इमारत अशी नोटीस लावली. वेळीच खबरदारी घेतल्याने संभाव्य धोका टळला आहे.
एस एन इमारतीप्रमाणेच खेड शहरात आणखी काही इमारती आणि घरे राहण्यासाठी धोकादायक झालेली आहेत. याबाबत संबंधितांना वारंवार नोटीस बजावण्यात आल्या आहेत. ज्या इमारती किंवा घरे धोकादायक झाली आहेत त्या घरांसाठी किंवा इमारतींच्या दुरुस्तीसाठी नगरपालिकेची रीतसर परवानगी घेऊन दुरुस्ती करावी असे ही संबंधितांना बजावण्यात आले आहे. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नगरपालिका प्रशासनाकडून धोकादायक घरे आणि इमारती मध्ये राहणाऱ्या नागरिकांना नोटीस बजावण्यात येत आहेत. मात्र नागरिकांकडून दुर्लक्ष केले जात आहे.
खेड शहरात ज्या ज्या धोकादायक इमारती आणि घरे आहेत त्या इमारतींचे आणि घरांचे सर्वेक्षण करून धोकादायक इमारती आणि घरांची डागडुजी करण्याबाबत संबधीताना बजावण्यात येईल असे ढोरजकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.



























































