
मुंबईसह राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या ऑक्टिव्ह रुग्णांची संख्या आता कमी होऊ लागली आहे. राज्यात सध्याच्या घडीला एकूण 85 हजार 503 अॅक्टिव रुग्ण असल्याचे आरोग्य विभागातर्फे जाहीर करण्यात आले आहे. दरम्यान, गेल्या चोवीस तासांत 4 हजार 237 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आरोग्य विभागातर्फे जाहीर करण्यात आले आहे. राज्य सरकारच्या आरोग्य विभागातर्फे जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार दिवसभरात एकूण 2 हजार 707 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे आता कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या 16 लाख 12 हजार 314 वर पोहचली आहे. तर कोरोनामुळे दिवसभरात एकूण 105 जणांचा मृत्यू झाला आहे.
मुंबईत कोरोनाचे 726 नवे रुग्ण
मुंबईत गेल्या 24 तासांत कोरोनाचे 726 नवे रुग्ण आढळले असून 16 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 850 जण कोरोनामुक्त झाल्यामुळे मुंबई आतापर्यंत डिस्चार्ज होणाऱ्या रुग्णांची संख्या 2 लाख 44 हजार 659 झाली आहे. मुंबईत कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढल्याने सद्यस्थितीत केवळ 10 हजार 77 सक्रिय रुग्ण आहेत. तर मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 91 टक्क्यांवर गेले असून कोविड वाढीचा दर 0.29 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. तर रुग्ण दुपटीचा कालावधी 243 दिवसांवर पोहोचला आहे. दरम्यान, मुंबईत एकूण रुग्णसंख्या 269130 झाली असून मृतांची संख्या 10555 झाली आहे.



























































