महामार्गावरील 90 टक्के अपघात मानवी चुकांमुळे, सेव्ह लाईफ संस्थेचा अहवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 बेफाम वेग, सीट बेल्ट लावण्याबाबतची उदासीनता, लेन कटिंग, हेल्मेटचा अभाव अशा विविध कारणांमुळे पुणे-सातारा आणि सातारा-कागल महामार्गावर 2019-20 या वर्षात रस्ते अपघातात तब्बल 125 जणांचा मृत्यू झाला आहे. महामार्गावरील 90 टक्के अपघात हे मानवी चुकांमुळे होत असल्याचे सेव्ह लाईफ फाऊंडेशन या संस्थेला एका अभ्यासात आढळून आले आहे.

राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीने परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील यांनी व्हीसीद्वारे बैठक आयोजित केली होती. सेव्ह लाईफ संस्थेने महामार्गावरील अपघातांच्या संदर्भात अभ्यास केला आहे. या संस्थेने एनएच-48 या महामार्गावर पाहणी करून अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी शासनाला सादर केलेल्या अहवालावर या वेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.

अपघातांची कारणे

अतिवेग, सीट बेल्ट न लावणे, हेल्मेट न घालणे, अचानक लेन बदलणे, इंडिकेटर्स, हेडलाईट सुस्थितीत नसणे अशा कारणांनी अपघात होत असल्याचे आढळून आले आहे.

वाहतुकीचे नियम पाळा

पुणे-सातारा आणि सातारा-कागल महामार्ग हा कॉरिडॉर ‘शून्य मृत्यू कॉरिडॉर’ बनविण्यासाठी तसेच राज्यातील सर्व महामार्ग, राज्यमार्ग वाहतुकीसाठी सुरक्षित बनविण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. सर्वांच्या सुरक्षिततेसाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, आपण सर्वांनीही वाहतुकीचे सर्व नियम काटेकोरपणे पाळून सुरक्षित प्रवास करावा, असे आवाहन सतेज पाटील यांनी केले.

महामार्गावर पेट्रोलिंग

पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर पोलीस प्रमुखांना महामार्गावर पेट्रोलिंगसाठी प्रत्येकी एक गाडी व टीम तयार करून तत्काळ पेट्रोलिंग सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

या बैठकीला विभागीय आयुक्त सौरभ राव, परिवहन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे, विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, पुणे, सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिह्याचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, महामार्ग पोलीस दलाचे अधिकारी व सेव्ह लाईफ फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पीयूष तिवारी आदी उपस्थित होते.

कुटुंबाचा आधार निखळतो

रस्त्यांवरील अपघातात दुर्दैवाने मृत्यू झालेल्यांपैकी बहुदा तरुण असतो, कुटुंबाचा आधार असतो, हे नुकसान कधीही भरून न निघणारे असते. अपघात हे नैसर्गिक कारणानेही होतात. पण 90 टक्के अपघात हे मानवी चुकांमुळे होत असल्याचे अनेक अहवालातून समोर आले आहे, अशी माहितीही या वेळी देण्यात आली.

राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी आठवडाभरात कृती आराखडा तयार करा.

z सतेज पाटील, परिवहन राज्यमंत्री