लातूर विभागातील 92 हजार 33 विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या लातूर विभागातील लातूर, नांदेड आणि धाराशिव या तीन जिल्ह्यातील 810 कनिष्ठ महाविद्यालयातील 92 हजार 33 विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार आहेत. दिनांक 4 ते 30 मार्च 2022 या कालावधीत ही परीक्षा होणार आहे. परिक्षेची संपूर्ण तयारी झाली असल्याची माहिती विभागीय सचिव सुधाकर तेलंग यांनी दिली.

लातूर जिल्ह्यात 340 कनिष्ठ महाविद्यालय, नांदेड 305 कनिष्ठ महााविद्यालय तर धाराशिव जिल्ह्यातील 165 कनिष्ठ महाविद्यालय अशा 810 कनिष्ठ महाविद्यालयातील 92 हजार 33 विद्यार्थ्यांनी इयत्ता बारावीच्या परीक्षेसाठी आवेदनपत्रे भरलेली आहेत. लातूर जिल्ह्यातील 36 हजार 20, नांदेड जिल्ह्यातील 39 हजार 248 तर धाराशिव जिल्ह्यातील 16 हजार 765 विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश आहे. यात विज्ञान शाखेतील 41 हजार 976, कला शाखेतील 35 हजार 327 तर वाणिज्य शाखेतील 10 हजार 436 तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमाचे 4293 तर आयटीआयच्या एका विद्यार्थ्याचा समावेश आहे.

सदरील परीक्षा घेण्यासाठी लातूर जिल्ह्यात 88, नांदेड जिल्ह्यात 85 तर धाराशिव जिल्ह्यात 39 अशी 212 केंद्र आहेत तर लातूर जिल्ह्यात 236, नांदेड जिल्ह्यात 204, धाराशिव जिल्ह्यात 113 अशी 553 उपकेंद्रे निर्माण केलेली आहेत. 15 पेक्षा कमी विद्यार्थी संख्या असणाऱ्या महाविद्यालयांची संख्या 45 असून त्यामध्ये लातूर जिल्ह्यातील 16, नांदेड जिल्ह्यातील 16 व धाराशिव जिल्ह्यातील 13 महाविद्यालयांचा समावेश आहे. 46 परिरक्षक व 553 रनर यासाठी नियुक्त करण्यात आलेले आहेत, अशी माहिती विभागीय सचिव सुधाकर तेलंग यांनी दिली.