
राज्यात मागील वर्षी डिसेंबर व या वर्षी जानेवारी महिन्यात झालेली गारपीट व अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकर्यांना 93 कोटी 58 लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. त्यामुळे संकटात सापडलेल्या शेतकर्यांना मोठा आर्थिक आधार मिळणार आहे.
राज्यात डिसेंबर 2019 व जानेवारी 2020 गारपीट व अवकाळी पावसाचा तडाखा राज्याच्या अनेक भागातील शेतकर्यांना बसला होता. यामध्ये सुमारे 98 हजार 81 हेक्टरवरील शेती व फळबागांच्या नुकसानीचे पंचनामे करून राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषानुसार मदत देण्याच्या सूचना राज्य सरकारने दिल्या होत्या. यामध्ये शेतीचे 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतकर्यांना आवश्यक असलेल्या मदतीचा प्रस्ताव कृषी आयुक्तांकडून राज्याच्या महसूल व वनविभागाला सादर झाला होता. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपीकांचे नुकसान झाल्यामुळे नुकसानग्रस्त शेतकर्यांना मदतीचा निधी वितरित करण्याचा निर्णय मंत्रीमंडळाच्या उपसमितीमध्येही घेण्यात आला होता. त्यानुसार जळगाव, अमरावती, यवतमाळ, वाशिम, वर्धा, नागपूर, भंडार्यामधील नुकसानग्रस्त शेतकर्यांना 93 कोटी 58 लाख रुपयांचा निधी वितरित करण्यास राज्याच्या महसूल व वन विभागाने मान्यता दिली आहे. ही मदत थेट शेतकर्यांच्या बँक खत्यात जमा होईल. शेतकर्यांच्या मदतीच्या रक्कमेतून कोणत्याही बँकेने कोणत्याही प्रकारची वसुली करू नये असे स्पष्ट आदेश महसूल व वन विभागाने दिले आहेत.


























































