
सामना प्रतिनिधी । पंढरपूर
विधानसभेचे सर्वांत ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख यांना 93व्या वर्षीही पाण्यासाठी लढा द्यावा लागला. तिसंगी तलावात पाणी सोडावे या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनात आमदार देशमुख सहभागी झाले. शुक्रवारी दुपारपासून ठिय्या मांडला. शेतकऱयांसोबत रात्रीही याच कालव्यावर त्यांनी मुक्काम केला. अखेर तिसंगी तलावात पाणी सोडण्यास जलसंपदा विभागाने हिरवा कंदील दाखविल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. दरम्यान, आमदार भारत भालके, माजी आमदार शहाजी पाटील, दीपक साळुंखे आदी या आंदोलनात सहभागी झाले होते.
नगरमध्ये राम शिंदेंचा ताफा अडवला
मराठवाडय़ाला पाणी देण्यास नगर जिल्हय़ातून विरोध तीक्र होत आहे. आज नगर जिल्हय़ातील अनेक तालुक्यांत आंदोलन करण्यात आले. अकोले शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले. श्रीरामपूर शहरात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले तर राहतामध्ये शिवसैनिकांनी पालकमंत्री राम शिंदे यांच्या गाडय़ांचा ताफा अडवला आणि पाणी वाटप कायदा रद्द करण्याची मागणी केली.



























































