सूर, काव्य सुमधुर गीतांनी सजली संमेलनाची पूर्वसंध्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

धुक्याची अलवार चादर, हवेतील गुलाबी गारवा, रंगीबेरंगी कुसुमांनी सजलेल्या कुसुमाग्रज नगरीत काव्य, सूर आणि संगीत संध्येच्या मंतरलेल्या वातावरणात 94 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाची पूर्वसंध्या चिरस्मरणिय झाली.

नाशिकच्या कुसुमाग्रज नगरी (भुजबळ नॉलेज सिटी) मध्ये  आजपासून (दि. 3)  होत असलेल्या 94व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला ‘ गायक, संगीतकार, दिग्दर्शक सलील कुलकर्णी आणि कवी संदीप खरे यांनी सादर केलेली  ‘माझे जिवीची आवडी’  ही काव्य, गीत, संगीताने सजलेली मैफल रंगली.

मैफलीत संत रचनांपासून, स्वातंत्र्यवीर सावरकर, भा. रा.  तांबे, कुसुमाग्रज, आरती प्रभू,  कवी ग्रेस, शंकर वैद्य, विंदा करंदीकर, मंगेश पाडगांवकर, शांता शेळके, वसंत बापट यांच्या सिद्धहस्त लेखणीतून अजरामर झालेल्या कविता गीत सादर झाले.

गायक हृषिकेश रानडे, विभावरी आपटे, शरयू दाते, शुभंकर कुलकर्णी आणि सलील कुलकर्णी यांनी गायलेल्या गाण्यांना रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.