
सामना प्रतिनिधी, मुंबई
राज्यात महामार्गावर प्रवाशांच्या सोईसाठी १६० ठिकाणी स्वच्छतागृहे बांधण्यात येणार आहेत. या स्वच्छतागृहांची माहिती गुगल मॅपसारख्या ऍपवरही उपलब्ध करून देण्यात येईल.
भारतीय स्त्रीशक्ती संघटनेच्या वर्षा पवार-तावडे यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने मंत्रालयात सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. राज्यातील प्रमुख महामार्गांवर स्वच्छतागृहांची उभारणी करावी यासह महिला प्रवाशांच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या सुविधांच्या मागण्यांचे निवेदन या शिष्टमंडळाने सार्वजनिक बांधकाममंत्री पाटील यांना दिले. त्यावेळी महामार्गावर १६० ठिकाणी स्वच्छतागृहे बांधण्यात येणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली. प्रामुख्याने महिला प्रवाशांसाठी महामार्गावरील स्वच्छतागृहांमध्ये सॅनिटरी नॅपकिन्स व्हेडिंग मशीन आणि सॅनिटरी पॅडची विल्हेवाट लावण्यासाठी इन्सिनेटर उपलब्ध करून देण्याच्या मागणीचा यामध्ये समावेश होता. सार्वजनिक बांधकाममंत्र्यांनी ही मागणी मान्य करून महामार्गावरील स्वच्छतागृहांमध्ये याची व्यवस्था करण्यात येईल असे आश्वासन दिले.
महामार्गाच्या कडेला उभारण्यात येणाऱया स्वच्छतागृहांच्या सुरक्षेची जबाबदारी तसेच दुरुस्ती आणि देखभालीची जबाबदारी स्वच्छतागृह उभारणाऱया संस्थेकडेच तीन वर्षांसाठी असेल. तसेच संबंधित व्यक्तीकडून स्वच्छतागृहांची देखभाल योग्यप्रकारे होते की नाही हे पाहण्याची जबाबदारी महिला बचत गटाकडे देण्यात येईल, असेही पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.





























































