
सामना प्रतिनिधी । पुणे
जीवनासारखं अनमोल काही नाही, हे कळण्याअगोदरच जीव नकोसा होऊन आत्महत्या करण्याचे प्रमाण सध्या वाढतेय. कारणे अनेक आहेत; पण संयम आणि सहनशीलतेचा अभाव हीच त्यामागची प्रमुख कारणे म्हणता येतील. आर्थिक किंवा नातेसंबंधांतील ताण, एकटेपणा, नैराश्य, मनासारखे न होणे यांचा यामध्ये प्रामुख्याने समावेश आहे. न्यूनगंडाने पछाडूनही जीव देण्याच्या घटना घडतात. आत्महत्या करणाऱ्यांमध्ये १५ ते ३० वयोगटातील व्यक्तींचे प्रमाण सर्वाधिक असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.
‘हम दो, हमारे दो’ ही नवीन कुटुंबव्यवस्था अस्तित्वात आली. पती-पत्नी दोघेही नोकरी-व्यवसाय करीत असल्यामुळे मुलांचे एकाकीपण वाढले. या नव्या व्यवस्थेत ‘अडगळ’ ठरू लागलेल्या आजी-आजोबांची रवानगी वृद्धाश्रमात करण्यात आली. साहजिकच मुलांप्रमाणे तेही एकाकी पडले.
‘आजच्या धावपळीच्या युगात कुटुंबासोबत अत्यंत अभावानेच संवाद होतो. पण सोशल मीडिया अनेकांच्या जीवनाचा अविभाज्य अंग बनले आहे. अनेकजण आपल्या जीवनातील महत्त्वाचे प्रसंग सोशल मीडियावर टाकतात. यामुळे कठीण प्रसंगात, समस्येवेळी एकटेपणा येतो. त्यातून निराशेची भावना वाढीस लागते. तसेच यश-अपयश, मान-अपमान खिलाडू वृत्तीने पचविता येत नसल्यामुळे अगदी क्षुल्लक कारणावरून जीवन संपविण्याकडे मुला-मुलींचा कल वाढला. आजी-आजोबा तर सोडाच, आई-वडिलांच्या प्रेमाला पारखे झालेल्या मुलांमध्ये हट्टीपणा वाढीस लागला. त्यातून आत्महत्येसारख्या टोकाच्या निर्णयापर्यंत मुला-मुलींची मजल गेली. ही बाब लक्षात घेऊन ‘कनेक्टिंग एनजीओ’ने आत्महत्येचा विचार करणाऱ्यांना त्यापासून परावृत्त करण्यासाठी हेल्पलाइन सुरू केली. या माध्यमातून आतापर्यंत देशभरातील २३ हजार व्यक्तींना मार्गदर्शन करून आत्महत्येपासून परावृत्त केले आहे,’ अशी माहिती संस्थेचे समन्वयक विक्रमसिंग पवार यांनी दिली.
पवार म्हणाले, ‘आत्महात्या करणाऱ्या व्यक्तींचे वागणे चूक की बरोबर हे ठरविण्यापेक्षा त्यांची मते जाणून त्यांना भावनिकदृष्ट्या मदत आणि समजून घेण्यावर भर दिला जातो. त्यानुसार मार्गदर्शन केले जाते. या व्यक्तींविषयी गोपनीयता पाळली जाते. यामुळे निराश मनस्थितीत असलेल्या व्यक्तीला आधार मिळतो. यासाठी एनजीओचे ८० प्रशिक्षित स्वयंसेवक वर्षातील ३६५ दिवस रोज दुपारी १२ ते रात्री ८ पर्यंत हेल्पलाइनवर उपलब्ध असतात.’






























































