‘सलमान टॉकीज’ लवकरच तुमच्या भेटीला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

अभिनेता, चित्रपट निर्माता सलमान खान आता ‘सलमान टॉकिज’ काढणार आहे. चकित झालात ना? हो हे खरं आहे. मागील काही वर्षांपासून सलमानच स्वप्न असलेलं ‘सलमान टॉकिज’चं निर्माण सलमान खान करणार आहे. म्हणजेच आतापर्यंत अभिनेता आणि निर्माता असलेला सलमान आता चित्रपटगृहांचा मालक म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

याबाबतची माहिती देताना सलमानने सांगितलं की, मी चित्रपटगृहांची शृंखला निर्माण करण्याच्या विचारात आहे. या चित्रपटगृहांच्या तिकीटावर कर लावण्यात येणार नाही आणि सोयीसुविधांपासून वंचित असणाऱ्या लहान मुलांसाठी येथे तिकीटे मोफत दिली जातील. ही चित्रपटगृहे मुंबईच्या बाहेर असतील. त्याच्या प्रकल्पाबद्दल अधिक समजून घेण्यासाठी त्याने अनेक निर्माते, वितरकांशी चर्चा केली आहे. महाराष्ट्रातल्या छोट्या राज्यात ही चित्रपटगृहे बनवली जातील आणि येत्या १० वर्षांत सलमान टॉकिजची शृंखला इतर राज्यांमध्ये देखील प्रस्थापित होईल.

चित्रपटांच्या तिकीट दरांबद्दल बोलताना सलमान म्हणाला की, ४००-५०० रुपये तिकीटांची किंमत असतील तर छोट्या राज्यांतील खूप कमी लोकं चित्रपट पाहायला येतील. तिकीटांचे दर हे विकएंडला २००-२५० रुपये तर विकडेजला १००-१५० रुपये असावेत, असं मला वाटतं. त्यामुळे तिकीटदर कमी ठेवण्याकडे माझा कल असेल. आपल्याकडे हिंदी आणि प्रादेशिक चित्रपट खूप प्रमाणात बनवले जातात, त्या चित्रपटांना वाव देण्यासाठी अशा प्रकल्पांची गरज आहे, असं सलमानचं म्हणणं आहे.