लातूरमध्ये मुंडके नसलेला सापळा सापडल्याने खळबळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी।किल्लारी

निलंगा तालुक्यातील नणंद शिवारातील विहिरीत एक मुंडके नसलेला सापळा सापडल्याने लातूरमध्ये खळबळ उडाली आहे. सापळ्याच्या अंगावर कपडे असून त्याच्या पँटीच्या खिशात आधारकार्ड सापडले आहे. त्यावर विवेकानंद बजरंग धुमाळे (२३) रा वाढवना (बु) ता उदगीर असा पत्ता नमूद करण्यात आला आहे. दरम्यान पोलीस मुंडक्याचा शोध घेत आहेत.

आनंदवाडी (ता औसा) येथील दगडू बापू सूरवसे यांच्या नणंद शिवारातील विहीरीत हा सापळा तरंगत असल्याचे गोविंद खजे यांना दिसले. त्यानंतर त्यांनी ताबडतोब याबदद्ल किल्लारी पोलीस ठाण्यात कळवले. सापळा सापडल्याचे कळताच पोलिसांनी शिवारात धाव घेतली व सापळा बाहेर काढला. तेव्हा त्याला मुंडके नसल्याचे आढळून आले. सापळ्याची अवस्था बघून मृतदेह पाच सहा दिवसापूर्वी विहिरीत फेकण्यात आला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

दरम्यान पुढील तपासणीसाठी सापळा निलंगा उपजिल्हा दवाखान्यात ठेवण्यात आला आहे. सापळ्याच्या पॅन्टीच्या खिशात आधार कार्ड, एटीएम कार्ड सापडले आहे. त्यावर विवेकानंद बजरंग धुमाळे रा वाढवना (बु) ता उदगीर असे नमूद करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. याबद्दल वाढवना पोलिस ठाण्याशी संपर्क केला असता त्या ठिकाणी एक तरुण बेपत्ता असल्याची केस दाखल असल्याचे सांगण्यात आले. त्यावरुन पोलीस अधिक तपास करत आहेत.