माऊंट एव्हरेस्टवर कचरा वाढतोय !

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । काठमांडू

गेली कित्येक दशके जगातील सर्वांत उंच शिखर असलेल्या माऊंट एव्हरेस्टवर असंख्य व्यावसायिक, गिर्यारोहक चढाई करीत आहेत. शिखर सर झाल्याचा आनंद लुटायचा आणि आपण फेकलेल्या कचऱ्याकडे दुर्लक्ष करायचे या गिर्यारोहकांच्या वृत्ती व अनास्थेमुळे माऊंट एव्हरेस्टवर व त्याच्या मार्गावर कचरा वाढत चालला आहे.

समुद्रसपाटीपासून ८, ८४८ मीटर उंच असलेल्या (२०,०२९ फूट) माऊंट एव्हरेस्ट शिखरावर गिर्यारोहकांनी वापरलेले फ्लुरोसेंट टेंट, निकामी गिर्यारोहणाची उपकरणे, रिकामे ऑक्सिजन कॅनिस्टर, इतकेच नव्हे तर तेथे मानवाने केलेले शौच यामुळे तेथील कचऱ्याचे प्रमाण वाढतच चालले आहे.

तब्बल १८ वेळा माऊंट एव्हरेस्ट सर केलेले पेम्बा दोरजे शेरपा यांना माऊंट एव्हरेस्टवरील कचरा डोळ्यांत खुपतोय. ते पाहणे भयावह आहे, असे पेम्बा यांनी सांगितले. या पर्वतावर टनावारी कचरा साठला आहे. गिर्यारोहकांची संख्या वाढत असल्याने कचराही वाढतोय. यंदा ६००हून अधिक लोकांनी माऊंट एव्हरेस्टवर चढाई केली आहे, असे पेम्बा म्हणाले.

पाच वर्षांपूर्वी नेपाळ सरकारने गिर्यारोहकांच्या प्रत्येक पथकाला ४००० डॉलर्स डिपॉझिट ठेवण्याची सक्ती केली होती. प्रत्येक गिर्यारोहकाने किमान ८ किलो कचरा शिखरावरून खाली आणल्यास डिपॉझिट परत केले जाणार होते, तर तिबेटमधून माऊंट एव्हरेस्टवर गेले, तर ८ किलो कचरा खाली आणण्याचे बंधन घातले आहे. जर कचरा आणला नाही, तर प्रतिकिलो मागे १०० डॉलर्स दंड आकारला जातो.

सागरमाथा प्रदूषण नियंत्रण समितीच्या माहितीनुसार नेपाळच्या गिर्यारोहकांनी २०१७ मध्ये २५ किलो कचरा आणि १५ टन मानवी मल शिखरावरून खाली आणला होता. या शिखरावरील कचरा कमी करण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यात बायोवेस्ट प्रकल्प उभारण्याचा समावेश आहे.