
सामना प्रतिनिधी, राहुरी
दोन दशकांचा कालावधी उलटुन ही देवळाली प्रवरा गावाच्या स्वतंत्र पोलीस स्टेशनला मुहूर्त मिळत नसल्याने गुरूवार ५ जुलैला मुख्यमंत्र्याच्या वर्षा निवासस्थानासमोर आत्मदहन करण्याचा इशारा देवळाली प्रवरा शिवसेना शहर प्रमुख सुनिल कराळे यांनी दिला आहे. मतदार संघाच्या पुर्नरचनेत राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा सर्कल मधील ३२ गावे श्रीरामपुर मतदार संघात जोडली गेली आहेत.या गावांची लोकसंख्या तसेच वाढता विस्तार पाहता स्वतंत्र पोलीस स्टेशनच्या मागणीचा प्रस्ताव मंजुर झालेला आहे. मात्र गेल्या २ दशकांपासून पोलीस स्टेशन अस्तित्वात आलेले नाही. स्वतंत्र पोलीस स्टेशनसाठी पुरेशी जागा उपलब्ध असली तरी या जागेवर देवळाली प्रवरा नगर परिषदेचे आरक्षण आहे.आर्थिक निधीची तरतूद होणे देखील शक्य असताना नेमके घोडे अडले कुठे? हा सवाल गुलदस्त्यात राहिला आहे. आजवरच्या जिल्हा पोलीस प्रमुखांनी देवळालीला भेटी देऊन स्वतंत्र पोलीस स्टेशन देण्याचे आश्वासन अनेकदा दिले आहे. मात्र, हे आश्वासन हवेत विरले आहे.
या कालावधीत संगमनेर तालुक्यातील आश्वी, नेवासा तालुक्यातील सोनई व श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडीला स्वतंत्र पोलीस स्टेशनचा दर्जा मिळाला असून कामकाज देखील सुरू झाले आहे.मात्र कुचकामी नेतृत्वाअभावी देवळाली प्रवरा येथे स्वतंत्र पोलीस स्टेशन सुरू होण्याचे घोडे अडल्याचा आरोप कराळे यांनी केला आहे. नगर मनमाड राज्य मार्ग तसेच महाराष्ट्रासह इतर राज्यातील वाहतूक देवळाली मंडल मधील काही गावातून होत असल्याने अपघाताच्या लहान मोठ्या घटना अधूनमधून घडत आहेत. शिर्डी शिंगणापूर या जागतिक ख्याती असलेल्या देवस्थान कडे जाणा-या मार्गावर देवळाली मंडल मधील काही गावे असल्याने वाहतुकीची वर्दळ देखील वाढली आहे. तसेच गुन्हेगारीचा वाढता आलेख लक्षात घेता सध्या सुरू असलेल्या देवळाली प्रवरा दुरक्षेत्रावरील ५ पोलीस कर्मचाऱ्यांच्या कामावर मर्यादा आल्या आहेत.
स्वतंत्र पोलीस स्टेशन सुरू झाल्यास पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या वाढून कार्यक्षेत्रातील कायदा व सुव्यवस्थ अबाधित ठेवण्यास मदत होणार आहे. स्वतंत्र पोलीस स्टेशन सुरू करण्याच्या मागणीचे घोंगडे गेल्या अनेक वर्षांपासून भिजत पडले आहे.आघाडी सरकारच्या काळात या प्रस्तावास मंजुरी मिळाली असली तरी राज्यातील भाजपा सरकारच्या काळात या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचे कराळे यांनी म्हटले आहे.

































































