
सामना प्रतिनिधी । मुंबई
लोकसभा निवडणुकीआधी भाजपविरोधात ‘महाआघाडी’ व्यवहार्य नाही, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज एका इंग्रजी वृत्तवाहिनीशी बोलताना व्यक्त केले.
लोकसभा निवडणुकीबाबत बरेच अंदाज आणि शक्यता मीडियातून व्यक्त केल्या जात आहेत. राजकीय पर्यायाबाबत लिहिले जात आहे. आमच्या काही मित्रांना ‘महाआघाडी’ निवडणुकीआधी तयार व्हावी, असे वाटत आहे. पण मला तरी तशी शक्यता अजिबात दिसत नाही, असे त्यांनी सांगितले.
मात्र निवडणुकीआधी ‘महाआघाडी’ तयार झाली नाही तरी निवडणुकीनंतर भाजपविरोधी साऱया शक्ती हमखास एकवटतील, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.
तामीळनाडूचे उदाहरण देऊन पवार पुढे म्हणाले की, द्रमुक हा तिथे पहिल्या क्रमांकाचा पक्ष आहे. ही वस्तुस्थिती इतर भाजपविरोधी पक्षांना मान्यच करावी लागेल.
त्या त्या राज्यात पहिल्या क्रमांकावर असलेल्या पक्षांचे प्राधान्य स्वतःचे स्थान आणखी बळकट करण्यालाच असेल; महाआघाडीला नव्हे, असे त्यांनी सांगितले.
२०१९च्या लोकसभा निवडणुकीनंतर देशातील प्रादेशिक पक्षच महत्त्वाची भूमिका बजावतील.
- शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

























































