
सामना प्रतिनिधी ।नांदेड
नांदेडच्या जुनामोंढा भागातील महाराजा रणजितसिंग व्यापारी संकुल येथील दोन गोडावूनवर धाड टाकून मंगळवारी दुपारी दोन वाजता आयुक्त लहुराज माळी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने दोन ते अडीच टन प्लॉस्टिक पिशव्या जप्त करुन व्यापारी सतीश अग्रवाल यांच्याविरुध्द कारवाई सुरु केली आहे.
प्लास्टिक बंदीच्या विरोधात नांदेड मनपाने गेल्या दोन -तीन दिवसात धडक कारवाई केली असून एकूण १६ जणांवर नांदेडच्या विविध झोनमध्ये ही कारवाई करुन आतापर्यंत जवळपास सव्वा लाख रुपये दंड त्यांच्यावर आकारला आहे. आज दुपारी दोन ते तीन वाजताच्या दरम्यान महापालिका आयुक्त लहुराज माळी, उपायुक्त माधवी मारकड, सहायक आयुक्त गुलाम सादीक, डॉ.मिर्झा बेग यांनी महाराजा रणजितसिंग मार्केट येथील दोन गोडावूनवर धाड टाकली. याठिकाणी मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा साठा आढळून आला. त्याची मोजणी सुरु असून, हा साठा जवळपास दोन ते अडीच टन असल्याचे सूत्रांनी सांगितले. मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा साठा करुन ठेवल्याची माहिती आयुक्तांना मिळाल्यानंतर त्यांनी स्वतः जुनामोंढा भागात जावून ही कारवाई केली. प्लास्टिक पिशव्यासंदर्भात जनतेने तसेच व्यापाऱ्यांनी सतर्क रहावे व प्लास्टिकचा वापर करु नये, असे आवाहन आयुक्त लहुराज माळी यांनी केले आहे. याबाबत काही गोपनिय माहिती असल्यास मनपाला त्याबाबत कळवावे, असे आवाहनही मनपाच्या वतीने करण्यात आले आहे. गोडावून धारक सतीश अग्रवाल यांच्यावर कारवाईची प्रक्रिया सुरु असून, त्यांना यापूर्वी दोनदा दंड आकारण्यात आला आहे. या कारवाईमुळे नांदेडच्या व्यापाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.



























































