
सामना ऑनलाईन । जम्मू
कश्मीरमध्ये व्हॉट्सअॅप ग्रुपवरून मोठ्या प्रमाणात अफवा, देशविरोधी पोस्ट टाकल्या जात असल्याची गंभीर दखल घेत किश्तवाडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी १० दिवसांत व्हॉट्सअॅप ग्रुपच्या ऍडमिनला कार्यालयात नोंदणी करण्याचे आदेश दिले आहेत. नोंदणी केली नाही तर आयटी कायदा, रणबीर पीनल कोड, सायबर क्राईम कायदा आणि अन्य कायद्यांतर्गत कारवाई केली जाईल, असा इशारा किश्तवाडचे जिल्हाधिकारी अंग्रेजसिंह राणा यांनी दिला. सोशल मीडियातून प्रत्येकजण व्यक्त होत असतो. ही अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहेच पण त्याचबरोबर अभिव्यक्त होताना जबाबदारी आणि काही बंधने पाळावी, असेही राणा म्हणाले.
कोणते आदेश दिले आहेत?
व्हॉट्सअॅप ग्रुपची ग्रुप अॅडमिनने नोंदणी केली पाहिजे. यात परदेशात राहणाऱ्या ग्रुप अॅडमिनचाही समावेश आहे. त्यांना याबाबतची सगळी माहिती देणे बंधनकारक आहे.
ग्रुपवर शेअर करण्यात आलेल्या कोणतीही पोस्ट किंवा फोटो वादग्रस्त वाटला तर त्याबाबत अधिकारी ग्रुप ऍडमिनला बोलावू शकतात. त्यावेळी ग्रुप अॅडमिनला उपस्थित राहावेच लागेल.
कोणत्याही प्रकारची संवेदनशील माहिती त्याला मिळाली तर त्याची माहिती जवळच्या पोलीस ठाण्याला देणे बंधनकारक आहे.
ग्रुपने नियम किंवा कायद्याचे पालन केले नाही तर तो ग्रुप बंद केला जाईल आणि त्याचबरोबर त्या ग्रुपवर योग्य ती कायदेशीर कारवाईसुद्धा केली जाईल.




























































