कचऱ्याच्या डंपरने मुलाला चिरडले, देवनार येथील दुर्घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

देवनार येथील शिवाजीनगर भागात कचऱयाच्या डंपरने धडक दिल्याने पाच वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. मोहम्मद गौस दस्तगीर अहमद (५) असे या घटनेत मरण पावलेल्या मुलाचे नाव आहे. या दुर्घटनेनंतर संतप्त झालेल्या स्थानिक रहिवाशांनी काही गाडय़ांची तोडफोड केल्याने परिसरात काही काळ तणाव पसरला होता.

शिवाजी नगर येथील प्लॉट नंबर २८,२९ मधील रोडवरून गोवंडी क्लीनअपचा डंपर भरधाव वेगाने जात होता. त्याचवेळी तेथून जाणाऱया पाचवर्षीय मुलाला या डंपरने धडक दिली. या धडकेत मुलगा गाडीच्या टायरखाली आल्याने गंभीररीत्या जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र त्याचा तत्पूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

या घटनेनंतर संतप्त झालेले तेथील रहिवासी रस्त्यावर उतरले. संतप्त जमावाने तेथील गाडय़ांची तोडफोड केल्याने तेथे काही काळ तणाव पसरला. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. याप्रकरणी देवनार पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून याबाबत पोलीस पुढील तपास करीत आहेत.