
सामना प्रतिनिधी। लातूर
तालूक्यातील मौजे मुरुड येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर अज्ञात चोरट्यांनी दरोडा घातला. गॅस वेल्डींगच्या सहाय्याने खिडकीचे गज कापून चोरटे बँकेत घुसले. बँकेची तिजोरी फोडून १७ लाखाची रोकड पळवण्यात आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.सोमवारी सकाळी बँक उघडण्याच्यावेळी ही घटना उघडकीस आली.
चोरट्यांनी बँकेच्या शटरला आतून कुलूप ठोकले होते. पाठीमागच्या बाजूकडील खिडकीचे गज गॅस वेल्डींगच्या सहाय्याने कापून काढण्यात आले होते. खिडकीमधून चोरटे बँकेत घुसले. बँकेची तिजोरीही गॅस वेल्डींगच्या सहाय्याने फोडण्यात आली. तिजोरीत मधील १७ लाखाची रोकड घेऊन त्यांनी पलायन केले. रविवारी बँकेला सुट्टी होती. त्यामुळे ही चोरी शनिवारी रात्री करण्यात आली की रविवारी रात्री याचा शोध घेण्यात येत आहे.
सोमवारी सकाळी बँक उघडण्यासाठी कर्मचाऱ्यांनी बँकेच्या शटरचे कुलूप काढले पण आतून कुलूप लावण्यात आलेले असल्यामुळे शटर उघडलेच नाही. पाठीमागील खिडकी पाहीली असता ती तोडण्यात आल्याचे निदर्शनास आले आणि ही चोरीची घटना उजेडात आली.
बँकेत सीसीटीव्हीची व्यवस्था नसल्याकारणामुळे चोरट्यांनी निवांतपणे ही चोरी केली असावी असे म्हटले जात आहे. कारण खिडकीचे गज कापणे, तिजोरी कापून काढणे याल बराच वेळ लागतो. याप्रकरणी मुरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
























































