मुंबईला दिवसभर पावसाने झोडपले; रेल्वे अडखळली, रस्ते पाण्याखाली!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, वसई

मुसळधार पावसाच्या तडाख्यामुळे वसई शहर व परिसर पाण्याखाली गेला. येथील मिठागराला पुराचा वेढा पडला. त्यात तीनशे कुटुंबे अडकून पडली असून त्यांचा संपर्क तुटला आहे. या कुटुंबांच्या मदतीसाठी ३० स्पीड बोटी रवाना झाल्या असून एअर बोटीतून अन्नाची पाकिटे वाटण्यात आली. रस्ते पाण्याखाली गेल्याने मिठागरापर्यंत पोहोचणे मुश्कील झाले आहे. या कुटुंबांना वाचवण्यासाठी वसई-विरार महापालिकेची अग्निशमन यंत्रणा प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहे. चारही बाजूने मिठागराला पाण्याने वेढल्याने येथील तीनशे कुटुंबांचा जीव धोक्यात आला.

आज पहाटेपासून हा परिसर पाण्याखाली गेला. घरातील सामानसुमान आवरेपर्यंत पाणी घरात घुसले. तुफान पावसामुळे पाण्याची पातळी वाढू लागली आणि प्रचंड घबराट पसरली. मिठागर परिसराची अक्षरशः नदी झाली. या परिसराकडे जाणारे रस्ते पाण्याखाली गेले. त्यामुळे या परिसराचा शहरी भागाशी पूर्णपणे संपर्क तुटला आहे. रस्ताच पाण्याखाली गेल्याने रहिवाशांपर्यंत पोहोचण्यासाठी अखेर बोटींचा वापर करावा लागला. सकाळी पट्टीचे पोहणारे सात जीवरक्षक, तलाठी तसेच पोलीस व आपत्कालीन विभागाचे कर्मचारी बोटीने मिठागरात पोहोचले. तेथील गावकऱ्यांना त्यांनी अन्नाची पाकिटे वाटली. सोबत डॉक्टरांचे पथकही असल्याने त्यांना वैद्यकीय सुविधादेखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.

बोटीतून अन्नाची पाकिटे वाटली
वसईच्या नाळा गावातील वेणापट्टी येथील आदिवासी पाडय़ात प्रचंड पाणी साचल्याने १८ घरांमध्ये पाणी शिरले आहे. या पाडय़ावरदेखील २०० आदिवासींची वस्ती असून बचावासाठी यंत्रणा पाठवण्यात आली. काही आदिवासींना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले असून त्यांनाही सर्वतोपरी मदत केली जात आहे.

गेल्या वर्षीचा रेकॉर्ड मोडला
गेल्या २४ तासांत कुलाबा येथे तब्बल १७०.६ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली. यंदाच्या मोसमातील हा सर्वाधिक पाऊस असल्याचे कुलाबा वेधशाळेचे उपसंचालक के. एस. होसाळीकर यांनी सांगितले. उद्या पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, गेल्या वर्षी जुलैच्या पहिल्या आठवडय़ात सरासरीच्या २७ टक्के पाऊस पडला होता, तर यंदा पावसाने ५४ टक्क्यांपर्यंत कोसळत दुप्पट कामगिरी केली. कुलाब्यामध्ये १६३.४ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली होती, तर सांताक्रुझमध्ये १२२ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली. दुपारनंतर पावसाचा जोर ओसरलेला असला तरी तोपर्यंत हवामान खात्याच्या कुलाबा केंद्रावर ७८.६ मि. मी. तर सांताक्रुझ इथे ६८.१ मि. मी. पावसाची नोंद झाली. मुंबई शहर तसेच उपनगरात ३२ ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या. २३ ठिकाणी झाडे तसेच झाडाच्या फांद्या कोसळल्या तर ११ ठिकाणी घरे तसेच भिंतीचा भाग पडल्याचा घटना घडल्या.

तुळशी तलाव ओव्हरफ्लो
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावक्षेत्रातही दमदार पाऊस सुरू असून मुंबईपासून जवळ असलेला तुळशी तलाव सकाळपासून ओसंडून वाहू लागला. गेल्या वर्षी हा तलाव १४ ऑगस्ट रोजी भरला होता. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावक्षेत्रात अद्याप समाधानकारक पाऊस पडत नसला तरी मुंबईपासून जवळ असलेल्या विहार आणि तुळशी तलावात मात्र दमदार पाऊस सुरू आहे. अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार व तुळशी या तलावांमध्ये मिळून ५,५०,६०१ द. ल. लिटर पाणीसाठा जमा झाला आहे.

दुप्पट पाऊस होऊनही मुंबई थांबली नाही
मुंबईत यंदा रेकॉर्डब्रेक पाऊस होऊनही मुंबईकर थांबले नाहीत. वाहतूक संथगतीने सुरू होती. रेल्वे वाहतूकही मंदावली. तरीही उशिरा का होईना, मुंबईकरांनी कार्यालये गाठली. लेटमार्क लागला तरीही दिवस भरून निघाला. दुपारनंतर मुंबईत पावसाचा जोर ओसरला. परंतु, ठाणे, रायगड, पालघर, वसई आणि विरार या ठिकाणी मात्र पावसाचा जोर कायम होता. सकाळी ठाणे, कळवा येथे रेल्वे रूळ पाण्याखाली गेले. त्याचा परिणामही रेल्वे वाहतुकीवर झाला.

लाइफ लाइन अडखळली
मध्य रेल्वेवर १००, तर पश्चिम रेल्वेवर पन्नासहून अधिक फेऱ्या रद्द
मुंबई आणि परिसरात गेले तीन दिवस पावसाने चांगलेच धुमशान घातल्याने मुंबईची लाइफ लाइन लोकल सेवा पार विस्कळीत करून टाकली. एरवी पावसाचा कोणताही प्रभाव न जाणवणारी पश्चिम रेल्वेही नालासोपारा येथील पुराने अडखळली. मध्य रेल्वेवर शंभर तर पश्चिम रेल्वेवर पन्नासहून अधिक फेऱ्या रद्द करण्यात आल्या. शंभरहून अधिक फेऱ्या उशिराने धावत होत्या. सकाळी लवकर लोकल चालू असल्यामुळे कामावर गेलेले चाकरमानी संध्याकाळी मात्र लोकलच्या गर्दीत सापडल्याने त्यांचे प्रचंड हाल झाले.

एसी लोकलच्या फेऱ्या रद्द
पश्चिम रेल्वेवर सोमवारी एसी लोकलच्या सोमवारी चार फेऱ्या रद्द झाल्या. चर्चगेट ते विरारमध्ये एसी लोकलच्या दिवसाला १२ फेऱ्या होतात. त्यातील सकाळच्या सत्रात दोन फेऱ्या चालल्या, पण नंतर चार फेऱ्या रद्द केल्या.

महाव्यवस्थापकांकडून पाहणी
पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक ए. के. गुप्ता यांनी नालासोपारा स्थानकात बैठक घेतली. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा यांनी सीएसएमटी ते ठाण्यापर्यंत लोकलने प्रवास केला. प्रवाशांच्या अडचणी लक्षात घेऊन त्या दूर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

लोकल पेंटोग्राफमध्ये शॉर्टसर्किट
ट्रान्स हार्बर मार्गावर तुर्भे येथे दुपारी पावणेतीनच्या सुमारास एका लोकलच्या पेंटोग्राफने पेट घेतला. शॉर्टसर्किटमुळे हा प्रकार झाल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यात कोणीही जखमी झालेले नाही.

पश्चिम रेल्वेवर नालासोपारा तर मध्य रेल्वेवर ठाणे व कळवा तसेच सायन येथे पाणी साचल्याने लोकलचा वेग कमी झाला. त्यातच दादर-माटुंगा येथे सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने तसेच सँडहर्स्ट रोड स्थानकात रेल्वेची संरक्षक भिंत कोसळल्याने डाऊन दिशेची वाहतूक वळविण्यात आली.
लोकलसह मेल, एक्स्प्रेस सेवाही खोळंबली. इंडिकेटरवर शून्य अशा वेळा दिसत असल्याने प्रवासीही गोंधळले होते. या मार्गांवर सेवा पाऊण ते एक तास उशिराने सुरू होती. सखल भागातील रुळांवर साचलेले पाणी पंपाच्या सहाय्याने काढण्यात आले. दुपारी चारपर्यंत पाणी ओसरल्यानंतर वाहतुकीचा वेग वाढला.
अंबरनाथ, कल्याण, कळवा, ठाणे, सायन, कुर्ला, वडाळा, चेंबूर, किंग्ज सर्कल, माटुंगा, दादर आदी वेगवेगळ्या भागांत रुळांवर पाणी तुंबले होते. मध्य रेल्वेवरील वाहतूक पाऊण ते एक तास उशिराने सुरू होती. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने जाणारी जलद लोकलही खोळंबली. हार्बर मार्गावरील लोकल सेवा अर्धा तास उशिराने सुरू होती.

भरतीमुळे पाणी साचले
सातत्याने कोसळणारा पाऊस आणि भरतीची वेळ असल्यामुळे मुंबईतील हिंदमाता, परळ, गांधी मार्केट, सायन चेंबूर, कुर्ला, मिलन सबवे, वांद्रे, बीकेसी, मालाड, गोरेगाव, कांदिवली, दहिसर, विक्रोळी पार्कसाइट, टिळकनगर या ठिकाणच्या सखल भागांत पाणी तुंबले. त्यामुळे रस्ते वाहतूक संथगतीने सुरू होती. अनेक ठिकाणी वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली. तिन्ही रेल्वे मार्गांवरील गाडय़ा उशिराने धावत होत्या. हवामान विभागाने आधीच मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने अनेकांनी घरीच बसणे पसंत केले.

अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर पालिकेचे ५ हजार कामगार तैनात
कुलाबा वेधशाळेने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर विभागीय सहाय्यक आयुक्तांना तत्काळ आपापल्या विभागात उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. महापालिकेचे ५ हजारांपेक्षा जास्त कामगार तैनात ठेवण्यात आले.

पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी ३६ जीवरक्षक
पर्यटकांनी समुद्राच्या पाण्यात जाऊन काही दुर्घटना घडू नये यासाठी ६ समुद्रकिनाऱ्यांवर ३६ जीवरक्षक, अग्निशमन दलाची पूर बचाव पथके, शहर आपत्ती प्रतिसाद पथकाचे सुरक्षारक्षक आवश्यक त्या साधनसामग्रीसह तैनात करण्यात आले आहेत.

सँडहर्स्ट रोड येथे संरक्षक भिंत कोसळली
सकाळी ११ च्या सुमारास सँडहर्स्ट रोड स्थानकाकडील संरक्षक भिंत धीम्या मार्गावर कोसळली. या भिंतीशेजारी म्हाडाच्या तीन इमारती आहेत. त्यात ६० रहिवासी राहतात. भिंत कोसळल्याचे लक्षात येताच रेल्वे, पालिका आणि म्हाडाचे अधिकारी घटना स्थळी पोहचले. ढिगारा उचलल्यानंतर वाहतूक सुरू झाली. मध्य रेल्वेने संरक्षक भिंत नव्याने बांधण्याचा इरादा जाहीर केला आहे.

गोखले पुलाची दक्षिणेकडील मार्गिका खुली
अंधेरी रेल्वे पूल दुर्घटनेनंतर बंद करण्यात आलेल्या गोखले उड्डाणपुलाच्या दक्षिणेकडील एक मार्गिका हलक्या वाहनांसाठी कालपासून खुली करण्यात आली आहे, मात्र पादचारी पुलाकडील उत्तरेकडील मार्गिका अद्यापही बंद ठेवण्यात आली आहे. गोखले पूल वाहतुकीसाठी बंद केल्याने स्थानिकांप्रमाणेच अन्य वाहनचालकांची गैरसोय झाली होती.