
सामना प्रतिनिधी, मुंबई
छोटय़ा पडद्यावरील ‘तारकमेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेत डॉ. हंसराज हाथीची भूमिका साकारून प्रेक्षकांना खळखळून हसवणारे अभिनेते कवी कुमार आझाद यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मीरा रोड येथील वोकार्ड रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या अकाली एक्झिटने हसमुख आणि मनमिळावू कलाकार हरपल्याची भावना कलाकारांनी व्यक्त केली आहे.
कवी कुमार आझाद हे २००८ पासून या मालिकेत काम करत होते. ‘मेला’ , ‘फंटूश’ सारख्या सिनेमांतही त्यांनी काम केले होते. मागील तीन दिवसांपासून त्यांची प्रकृती ठिक नव्हती. रविवारी रात्री ते कोमामध्ये गेले. वोकार्ड रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. गेल्या काही दिवसांपासून कवी कुमार आझाद हे वाढत्या वजनामुळे त्रस्त होते. त्यांचे वजन सुमारे २१५ किलो होते. २०१० मध्ये शस्त्रक्रियेच्या आधारे त्यांनी तब्बल ८० किलो वजन कमी केले होते.
मालिकेचे चित्रीकरण रद्द
‘तारकमेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका लवकरच दहा वर्षे पूर्ण करणार आहे. त्यासंदर्भात सोमवारी मालिकेच्या सेटवर खास मिटींग होती. मात्र आपल्या जिवलग मित्राच्या निधनाची बातमी समजताच सेटवर शोककळा पसरली. आणि मालिकेचे चित्रीकरण रद्द करण्यात आले.




























































