अतिवृष्टी… नेमकं कोण खरं बोलतंय? विनोद तावडे की मुख्यमंत्री?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
vinod-tawde-devendra-fadnavis

सामना ऑनलाईन । नागपूर

मुंबईत कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईकर संकटात असताना राज्याचे मंत्री त्यांना अधिक गोंधळात टाकताहेत. नागपूर पावसाळी अधिवेशनावेळी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मुंबईत अतिवृष्टी नाही अशी माहिती मीडियाला दिली. तर त्यानंतर सभागृहात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र मुंबईत अतिवृष्टी असल्याचा उल्लेख केला आहे. त्यामुळे आधीच संकटात सापडलेल्या मुंबईकरांच्या गोंधळात भर पडली असून नेमकं कोण खरं बोलतंय असा प्रश्न पडला आहे.

मुंबईत मुसळधार पाऊस आहे, मात्र अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला नाही. पाण्याचा निचरा होण्यास कोणतीही अडचण नाही, म्हणून शाळा-कॉलेजला सुट्टी नाही, अशी माहिती विनोद तावडे यांनी दिली. तर काही वेळात सभागृहात बोलताना मुख्यमंत्र्यांनी मात्र वेगळीच माहिती दिली. ते म्हणाले, ‘मुंबई,कोकणात गेले २-३ दिवस सातत्याने पाऊस पडतो आहे.
पालघर जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस पडतो आहे. नेव्ही, कोस्टगार्ड तिथे सतर्क आहेत. तिथे जिल्हा प्रशासन कार्यरत आहे. मुंबईत अतिवृष्टी झाल्याची माहिती आहे. ११ ठिकाणी पाणी साचलं आहे.’

आता या दोन्ही मंत्र्यांपैकी कोणाचं खरं मानायचं असा प्रश्न मुंबईकरांना पडला आहे.