
सामना ऑनलाईन । मुंबई
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या विद्यमाने प्रतिवर्षी कबड्डीमहर्षी स्व. शंकरराव (बुवा) साळवी यांचा जन्मदिन ‘कबड्डी दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने महाराष्ट्राच्या कबड्डीकरिता भूषणावह व गौरवास्पद कार्य करणारे खेळाडू, ज्येष्ठ खेळाडू, कार्यकर्ते, पंच, क्रीडा-पत्रकार यांना सन्मानित करण्यात येऊन प्रोत्साहित केले जाते. यंदा प्रथमच कबड्डीच्या मैदानातील तळमळीचे कार्यकर्ते स्व. रमेश देवाडीकर यांच्या स्मरणार्थ राज्य संघटनेने ‘श्रमयोगी कार्यकर्ता’ हा पुरस्कार सुरू केला. तो कोल्हापूरच्या बुरानुद्दीन शेख यांना जाहीर झाला. दुबईवीर रिशांक देवाडीगा आणि गिरीश इरनाक यांना मानाचा स्व. मधू पाटील स्मृती पुरस्कार, तर सायली केरीपाळेला स्व. अरुणा साटम स्मृती पुरस्कार देण्यात येणार आहे. राज्य कबड्डी असोसिएशनचे सचिव आस्वाद पाटील यांनी नुकतेच हे पुरस्कार जाहीर केले. परभणी येथील श्री शिवाजी महाविद्यालय, वसमत रोड येथे हा सोहळा रंगणार आहे. ‘सामना’- नाशिकचे नरेश गुजराथी आणि ‘लोकसत्ता’-पुण्याचे मिलिंद ढमढेरे यांना क्रीडापत्रकार म्हणून गौरविण्यात येणार आहे.
























































