
सामना ऑनलाईन, कल्याण
हॉटेलमधून काटे, चमचे, टॉवेल ग्राहक लंपास करत असल्याच्या घटना सर्रास घडत असताना उल्हासनगरमध्ये मात्र एका ग्राहकाने हॉटेल रूममधला एलईडी टीव्ही पळवल्याची घटना समोर आली आहे. मनोज आहुजा असे आरोपीचे नाव असून त्याला मध्यवर्ती पोलिसांनी अटक केली आहे.
मूळचे गुजरात येथील अहमदाबाद येथील रहिवासी असलेला मनोज आहुजा याने उल्हासनगर येथील नवीन गेस्ट हाऊस येथील हॉटेलमध्ये राहण्यासाठी रूम बुक केली. मात्र शुक्रवारी १३ जुलैला हॉटेल सोडताना या महाशयाने रुममधील २४ इंचचा एलईडी टीव्हीवरच हात साफ केला. रूम सोडल्यानंतर हॉटेलमधल्या कर्मचार्याच्या लक्षात ही चोरी आल्यानंतर लगेचच आहुजाला अडवण्यात आले. त्याची झडती घेतली असता एका पिशवीत टीव्ही सापडला. यानंतर हॉटेल मॅनेजर स्वामीदास डेवीड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी मनोज आहुजाला अटक करण्यात आली.






























































