मराठवाड्यात नव्या जिल्ह्याची निर्मिती होणार? अहवाल सादर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>उदय जोशी । बीड

अकरा तालुके असणाऱ्या बीड जिल्ह्याचे विभाजन करून अंबाजोगाई जिल्ह्याची निर्मित्ती करण्याची मागणी गेल्या दहा वर्षांपासून जोर धरून आहे. अंबाजोगाई करांचे हे स्वप्न लवकरच पूर्ण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्हा निर्मित्तीचे निकष निश्चित करण्यासाठी नेमलेल्या समितीने नुकताच आपला अहवाल सादर केला आहे.

बीड जिल्ह्याचे विभाजन करून अंबाजोगाई जिल्हा निर्मित्ती करण्याची मागणी दहा वर्षांपासून केली जात आहे, अंबाजोगाई ते बीड हे अंतर जास्तीचे असल्यामुळे जनतेला योग्य न्याय मिळू शकत नाही. शिक्षणाचे माहेर घर असणाऱ्या अंबाजोगाईकरांना नेहमीच केवळ आश्वासन दिले गेले होते मात्र आता अंबाजोगाई जिल्हानिर्मित्तीचा प्रश्न सुटेल अशी शक्यता आहे. सरकार या बाबत निर्णय घेऊ शकते, जिल्हानिर्मित्तीचे आणि विभाजनाचे निकष निश्चित करण्यासाठी शासनाने महसुलच्या अप्पर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती या समितीनं नुकताच आपला अहवाल सादर केला आहे, या अहवालाची तपासणी करून जिल्हाविभाजनाचे निकष प्रक्रिया सुरू केली आसल्याचे पत्र ३१ जुलै रोजी शासनाच्या कक्ष अधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्त आणि बीडच्या जिल्हाधिकारी यांना पाठवले आहे. जिल्हानिर्मित्तीचा निर्णय सरकार आता घेऊ शकणार आहे.

बीड जिल्ह्यात अकरा तालुक्याचा सध्या समावेश आहे. या जिल्ह्याचे विभाजन करून अंबाजोगाई, परळी, केज, धारूर, माजलगाव, रेणापूर या तालुक्याचा अंबाजोगाई जिल्ह्यामध्ये समावेश होऊ शकतो. मात्र माजलगाव तालुका बीड जिल्ह्यातच ठेवण्यात यावा आम्हाला अंबाजोगाईत नको अशी मागणी माजलगाव तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायत आणि जनतेने केली आहे. एकंदरीत पाच तालुक्याचा या जिल्ह्यात समावेश होऊ शकतो.