मुलीचा विष पिण्यास नकार, संपूर्ण कुटुंबाची विहिरीत उडी मारून आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

मध्य प्रदेशमधील बैतूल जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील बारस्कार कॉलनीत राहणाऱ्या एका कुटुंबाने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. कॅश व्हॅन ड्रायव्हर विनोद, त्याची पत्नी आणि साडे तीन वर्षाची मुलगी यांचा मृतांमध्ये समावेश आहे. मृत्यूपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे.

दैनिक भास्करने दिलेल्या वृत्तानुसार, संपूर्ण कुटुंबाने आधी विष पिऊन आत्महत्या करण्याचे ठरवले, परंतु साडे तीन वर्षाच्या मुलीने विष पिण्यास नकार दिला. पप्पा मला नाही मरायचं, मला मारू नका, असे म्हणून ती रडू लागली. त्यानंतर त्यांनी घरमालकाला नागपूरला जातोय असे सांगितले आणि बाहेर निघाले. परंतु ते नागपूरला न जाता जावरा गावी गेले आणि विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. तिघांचेही मृतदेह जावरा गावातील एका विहिरीत आढळून आल्यानंतर ही घटना समोर आली.

पोलीस अधीक्षक डी.आर. तेनीवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी दुधवाला दूध घालण्यासाठी आला तेव्हा त्याला घराचा दरवाजा उघडा दिसला. त्याने ही गोष्ट घरमालकाच्या निदर्शनास आणून दिली. घरमालक सुरेश मालवीय यांनी विनोदच्या घरात जावून पाहिले तेव्हा त्यांना पलंगावर एक सुसाईड नोट आढळली. माझ्यावर दोन लाखांचे कर्ज असल्याने आत्महत्या करत असल्याचे विनोदने सुसाईड नोटमध्ये नमूद केले आहे. त्यानंतर घरमालकाने पोलीस ठाण्यात संपर्क साधला. अखेर दुपारी तिघाचेही मृतदेह विहिरीत आढळून आले.