भूमिपुत्रांना डावलणाऱ्या हिंदुस्थान पेट्रोलियमवर शिवसेनेची धडक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

भूमिपुत्र मराठी उमेदवारांना डावलून प्रोसेस ऑपरेटर व बॉयलर ऑपरेटर पदांवर अमराठी उमेदवारांची भरती करणाऱया हिंदुस्थान पेट्रोलियम रिफायनरीवर शिवसेनेने बुधवारी धडक दिली. भरतीची नवीन जाहिरात काढल्याशिवाय निवड झालेल्या उमेदवारांना कंपनीत पाय ठेवू देणार नाही, असा इशारा हिंदुस्थान पेट्रोलियम व्यवस्थापनाला शिवसेनाप्रणीत स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाने दिला आहे.

हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन रिफायनरीमध्ये प्रोसेस ऑपरेटर व बॉयलर ऑपरेटर पदासाठी नुकतीच भरती झाली. त्या भरतीमध्ये मराठी उमेदवारांचे प्रमाण १० टक्केही नाही. याची माहिती मिळताच स्थानीय लोकाधिकार महासंघाचे सरचिटणीस, शिवसेना सचिव-खासदार अनिल देसाई यांनी कंपनीच्या एचआर विभागाचे महाव्यवस्थापक धर्मेंद्र शर्मा यांना चर्चेसाठी ‘शिवालय’ येथे बोलावून घेतले.

चर्चेत विविध विषय समोर येताच महाव्यवस्थापक शर्मा हे निरुत्तर झाले. मी नुकताच या पदावर आलो असल्याचे कारण त्यांनी समोर केले. त्यावर नवीन जाहिरात द्या अन्यथा निवडलेल्या अमराठी उमेदवारांना कंपनीत पाय ठेवू देणार नाही, असा इशारा देसाई यांनी दिला. याप्रसंगी महासंघाचे उपाध्यक्ष प्रदीप मयेकर, अनिल चव्हाण, लोकाधिकार समितीचे दिनेश भोसले, चारुदत्त खेडेकर, राजू कदम, रमाकांत घडशी, विजय राणे उपस्थित होते असे महासंघाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद आहे.

– त्याप्रसंगी झालेल्या चर्चेत हिंदुस्थान पेट्रोलियममध्ये सन २००० पासून झालेली नोकरभरतीची आकडेवारीच देसाई यांनी सादर केली. २०१५ मधील भरतीमध्ये भूमिपुत्रांचे प्रमाण जवळजवळ शून्य असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले.

– आयटीआय, एनसीटीव्हीटीला हिंदुस्थान पेट्रोलियममध्ये नोकरी देणे बंद करून त्याऐवजी डिप्लोमा उमेदवार घेतले जातात. बॉयलर ऑपरेटर म्हणून तीन वर्षे प्रशिक्षण देऊन त्यांना नोकरी न देता अमराठींची भरती केली जाते. मुख्यालय व मार्केटिंग विभागातील कामे कंत्राटी पद्धतीने केली जातात. त्यामुळे स्थानिकांचा रोजगार हिरावला जात असल्याचे देसाई यांनी ठणकावले.