
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
सर्वोच्च न्यायालयाने विवाहबाह्य संबंधात फक्त पुरुषांना शिक्षा देणे हे समानतेच्या कायद्याचे उल्लंघन असल्याचे सांगितले आहे. पाच न्यायमुर्तींच्या खंडपीठाने जोसेफ शाईन यांच्या याचिकेवर ही टिप्पणी केली आहे. तसेच पतीच्या संमतीने जर पत्नीने एका विवाहित पर पुरुषाशी शारिरीक संबंध ठेवले तर तो व्यभिचार ठरत नसल्याचेही सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. व्यभिचारासंबंधी असलेले कलम ४९७ हे फक्त विवाह पावित्र्यासाठी असल्याचे केंद्राने न्यायालयात सांगितले त्यावरही न्यायालयाने असहमती दर्शवली.
व्यभिचाराशी संबंधित कायद्यावर चाललेल्या याचिकेच्या सुनावणीवर न्यायालयाने आपले मत मांडले. विवाहित महिलेशी शारिरीक संबंध ठेवल्यास फक्त पुरुषांसाठी शिक्षेची तरतूद असल्याने याचिकाकर्त्याने याविरोधात आवाज उठवला होता. मुख्य न्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाने या प्रकरणी महिलांना आरोपी करणार्या कायद्याला न्यायालय हात लावणार नसल्याचेही सांगितले.

























































