बाबा राम रहिमने ४०० साधुंना केलं नपुंसक, न्यायालयात आरोप सिद्ध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । हरयाणा

साध्वी बलात्कार प्रकरणी डेरा सच्चा सौदाचा प्रमुख राम रहिम सध्या जेलची हवा खात आहे. साध्वीवर बलात्काराखेरीज ४०० साधुंना नपुंसक बनवल्याचा आरोपही त्याच्यावर करण्यात आला होता. यातील साधू नपुंसक प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून पंचकूला येथील सीबीआयच्या विशेष न्यायालयाने त्याच्यावर आरोप सिद्ध केला आहे. राम रहिमखेरीज डॉ. मोहिंद्र इन्सान आणि डॉ. पी. आर. गर्ग यांच्यावरही या प्रकरणात आरोप सिद्ध झाले आहेत.

या प्रकरणी बचाव पक्षाचे वकील ध्रुव गुप्ता यांनी राम रहिम याने कोणालाही नपुंसक न बनवल्याचा दावा केला होता. तसंच या प्रकरणा भादंविचे ३२६ कलम लावता येणार नाही असाही युक्तिवाद केला होता. कारण, या सर्व साधुंवर शस्त्रक्रिया झाली होती. ३२६ हे कलम कोणत्याही प्राणघातक शस्त्राच्या वापर केल्यानंतर लागू होतं, असा दावा गुप्ता यांनी केला होता. तसंच याच प्रकरणात राम रहिम याच्यावर लावलेला फसवणुकीचा आरोपही खोटा असल्याचं गुप्ता यांनी म्हटलं होतं. राम रहिम याचा या साधुंवर शस्त्रक्रिया करण्यात कोणताही वैयक्तिक लाभ नव्हता, त्यामुळे हे कलम त्यांच्यावर लावता येणार नाही, असा युक्तिवादही गुप्ता यांनी केला होता.

राम रहिम याने २००० सालात मोक्षप्राप्तीचं आमिष दाखवून तब्बल ४०० साधुंना शस्त्रक्रिया करायला लावली होती. ही शस्त्रक्रिया केल्यानंतर तुम्हाला मोक्षप्राप्ती होणं सुकर होईल, तसंच डेऱ्याची प्रतिष्ठाही वाढेल, असं राम रहिमने या साधूंना म्हटलं होतं. त्यानुसार या ४०० साधुंवर शस्त्रक्रिया करून त्यांना नपुंसक करण्यात आल्याचा आरोप राम रहिमवर झाला होता. या प्रकरणी सीबीआयने तपास करून राम रहिमवर आरोप सिद्ध केले आहेत.