
सामना ऑनलाईन । श्रीनगर
जम्मू कश्मीरच्या सोपोर जिल्ह्यात ३ ऑगस्टला सुरक्षा दलाबरोबर झालेल्या चकमकीत खुर्शिद अहमद मलिक या दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला होता. खुर्शिद दहशतवादी संघटनेत दाखल होण्यापूर्वी त्याने २४ जूनला पोलीस सब-इन्सपेक्टरपदाची परीक्षा दिली होती. या परीक्षांचे निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आले. या परीक्षेत खुर्शिद पास झाला असून त्याची निवड सब इन्सपेक्टरपदासाठी करण्यात आली आहे. मात्र, प्रशासनाच्या परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी जात असल्याचे सांगून खुर्शिद ३१ जुलैला घराबाहेर पडला होता. तो परतलाच नाही. सोपोरमध्ये झालेल्या चकमकीत त्याचा खात्मा करण्यात आला. यावेळी रियाज अहमद या त्याच्या साथीदाराचाही खात्मा करण्यात आला होता. तर एक जवानही या चकमकीत शहीद झाला होता.
खुर्शिद अल बद्र या दहशतवादी संघटनेत दाखल झाला होता. गेल्यावर्षीच त्याचे बीटेक पूर्ण झाले होते. गेट परीक्षेतही तो उतीर्ण झाला होता. आता तो सब इन्सपेक्टरची परीक्षाही उतीर्ण झाला आहे. खुर्शिद अभ्यासात हुशार होता. त्याला १० वीला ८३ तर १२ वीत ८० टक्के गुण मिळाले होते. बीटेक पूर्ण करून तो गेट परीक्षाही उतीर्ण झाला होता असे त्याच्या कुटुंबियांनी सांगितले. अभ्यासात हुशार असून तो धार्मिकही होता. तो पाचवेळा नमाज अदा करत होता. प्रशासनाच्या सेवेचा अर्ज भरण्यासाठी जात असल्याचे सांगून खुर्शिद ३१ जुलैला घराबाहेर पडला होता. तो परतलाच नाही, त्यानंतर त्याचा मोबाईलही बंद होता. तो दहशतवादी संघटनेत का दाखल झाला असा सवाल त्याच्या कुटुंबियांना पडला आहे.



























































