
सामना ऑनलाईन । बंगळुरू
पत्रकार गौरी लंकेश हत्याप्रकरणात खळबळजनक माहिती उघड झाली आहे. पुण्यातील एका डॉक्टरसह सुमारे सहाजणांनी कर्नाटकातील ग्रामीण भागात गोळीबाराची प्रॅक्टीस केली होती. ज्या शेतात ही प्रॅक्टीस करण्यात आली, त्याच शेताचे मालक भारत कुरणे यांना एसआयटीने अटक केली आहे. बेळगावातील जंबोती गावाजवळील शेतात काहीजणांनी गोळीबाराचा सराव केला होता. या प्रकरणी अटक करण्यात आलेला भारत कुरणे गौरी लंकेश हत्याप्रकरणातील 12 वा आरोपी आहे. एसआयटीने त्याला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी करण्यात येत आहे. त्याने शेतात फायरिंग रेंज तयार करून सराव करण्यास परवानगी दिली होती. या शेतात आरोपींनी विविध हत्यारांनी गोळीबाराचा सराव केला होता.
या शेतात धावत्या लक्ष्यावर गोळीबार करण्याचा सराव आरोपींनी केला होता. डोक्यावर किंवा चेहऱ्यावर गोळीबार केल्याने समोरची व्यक्ती वाचण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे त्यांना डोक्यावर लक्ष्य केंद्रीत करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. सराव करणाऱ्यांमध्ये पुण्यातील एका डॉक्टरचा समावेश आहे. दाभोळकर हत्याप्रकरणी सीबीआयने त्याला अटक केली आहे. आरोपी एकमेकांना नावाने बोलवत नव्हते. ते छोटा मियाँ, बडा भाई, भाई साहब असे सांकेतीक नावे वापरत होते असे सूत्रांनी सांगितले.गेल्या महिन्यात मदिकेरीमधून अटक करण्यात आलेला राजेश बंगेरा आरोपींचा मुख्य प्रशिक्षक होता, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. एप्रिल- मे 2013 मध्ये आरोपींनी सराव केला होता. त्यानंतर 20 ऑगस्टला दाभोळकर यांची गोळी मारून हत्या करण्यात आली होती.
कलबुर्गी यांच्या हत्येची चौकशी करणाऱ्या सीआयडी पथकाने गौरी लंकेश हत्या प्रकरणातील चार आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. कलबुर्गी यांच्या नातेवाईकांनी अमोल काळेला ओळखले असून त्याने दरवाजा ठोठावून कलबुर्गींबाबत मराठीत विचारणा केली होती. गौरी लंकेश, पानसरे आणि कलबुर्गी यांच्या हत्येचा काही संबंध आहे काय याचीही तपास पथकाकडून चौकशी करण्यात येत आहे. गौरी लंकेश आणि कलबुर्गी यांची हत्या 7.65 एमएम या एकाच देशी पिस्तूलाने करण्यात आल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे. पानसरे यांच्या हत्येसाठीही असेच पिस्तूल वापरण्यात आल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे या तिन्ही प्रकरणांचा संबंध असल्याचा संशय तपास पथकाला आहे.




























































