खेडमध्ये गोविंदांनी फोडल्या 24 सार्वजनिक आणि 450 खासगी हंडय़ा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। खेड

मच गया शोर सारी नगरी रे आया.. संभाळ तेरी घगरी रे, शोर मच गया शोर… आया माखन चोर, या हिन्दी सिनेमातील लोकप्रिय गाण्याच्या तालावर फेर धरत गोविंदा पथकांनी आज दिवसभर अनेक लहानमोठय़ा हंडय़ा फोडून दह्यादुधाची लुट केली. मध्यरात्री खेड शहरातील हनुमान मंदीर येथे बांधण्यात आलेली हंडी फोडल्यापासून गोविंदाचा दंगा सुरु झाला होता. रात्री उशीरापर्यंत दहीकाला उत्सवाची झिंग उतरलेली नव्हती.

खेडच्या परंपरेनुसार शहरातील हनुमान मंदीरात बांधण्यात येणारी दहीहंडी रात्री 12 वाजता फोडल्यावर खेडमध्ये दहिहंडी उत्सवाला सुरवात झाली. सोमवारी सकाळपासूनच माखनचोरांची टोळी बाजारपेठेतून हुंदडत होती. उंचावर बांधलेल्या हंडय़ा फोडून त्यातील दहीदुध लुटण्याची जणू चढाओढच लागली होती. झिंग आणणाऱया डिजेच्या तालावर गोविंदाचे पाय थिरकत होते. यंदा पाऊस नसल्याने काही ठिकाणी पाण्याचे फवारे उडवून गोविदांना चिंब भिजवले जात होते. पोलिसांच्या अहवालानुसार खेडमध्ये यंदा 24 सार्वजनिक तर 450 खासगी दहीहंडय़ा बांधण्यात आल्या होत्या.

तीनबत्ती नाका येथे शिवसेना- युवा सेनेच्या वतीने 1 लाख 51 हजार रुपयांची हंडी बांधण्यात आली होती ही हंडी पाहण्यासाठी प्रेक्षकांनी फार मोठय़ा प्रमाणात गर्दी केली होती. या ठिकाणी आलेल्या प्रेक्षकांना रिझवण्यासाठी विविध सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रेक्षकांना आपले नशीब अजमावण्यासाठी लकी ड्रा चेही आयोजन करण्यात आले होते. तीनबत्ती नाका येथील युवा सेनेची हंडी खेडवाशियांचे मुख्य आकर्षण होते. उंचावर बांधलेली युवा सेनेची हंडी फोडण्यासाठी अनेक गोविंदा पथकांनी प्रयत्न केले मात्र सायंकाळी उशीरापर्यंत ही हंडी फोडण्यात गोविंदा पथकांना यश आले नव्हते.