
सामना ऑनलाईन, मुंबई
पेट्रोल-डिझेल दरवाढीचा फटका स्कूल बसने प्रवास करणाऱया विद्यार्थ्यांच्या पालकांना बसणार आहे. दिवसेंदिवस पेट्रोलच्या दरात होणारी वाढ लक्षात घेऊन स्कूल बसची फी वाढविण्याचा निर्णय बसमालकांनी घेतला आहे. ऑक्टोबरपासून स्कूल बसच्या मासिक फीमध्ये 75 ते 100 रुपयांची वाढ होईल.
मुंबईत मंगळवारी पेट्रोलचा भाव प्रतिलिटर 86.72 रुपये एवढा आहे. सोमवारी 86.50 रुपयांनी मिळणारे पेट्रोल 24 तासात 86.72 रूपयांवर पोहोचले. पेट्रोलप्रमाणे डिझेलचे दरही वाढतच असून या वाढत्या महागाईचा फटका पालकांच्या खिशाला बसणार आहे. इंधनाचे दर सतत वाढत असल्याने स्कूलबसच्या फीमध्ये वाढ करण्याशिवाय पर्याय नाही, असे स्कूलबस ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी सांगितले.स्कूल बसची कमीत कमी अंतरावरील दरमहा फी 800 ते 1000 रुपये आहे. या फीमध्ये आता जास्तीत जास्त 100 रुपयांपर्यंत वाढ होणार आहे.ऑक्टोबरमध्ये शाळांच्या द्वितीय सत्राला सुरुवात होणार असून या सत्राच्या सुरुवातीला स्कूस बसची दुप्पट फी पालकांना द्यावी लागते. नेमकी या महिन्यातच स्कूल बसची फी वाढणार आहे.
- स्कूल बसची संख्या: राज्य- 40 हजार, मुंबई-8 हजार
- स्कूलबसप्रमाणे खासगी ट्रव्हल एजन्सीनेदेखील तिकीट दरात 10 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
रुपया घसरला… आणखी घसरणार
डॉलरच्या तुलनेत रुपयांची किंमत 71.37 ने खाली गेली आहे. रुपया आणखी घसरणार आहे, असे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अहवालात म्हटले आहे. मंगळवारी डॉलरच्या तुलनेत रुपया 16 पैशांनी घसरला. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या धोरणांमुळेच ही वेळ आल्याचे या अहवालात म्हटले आहे. या घसरणीवर उपाय म्हणून आरबीआय व्याजदरात वाढ करण्याचे जुनेच धोरण राबविणार आहे.


























































