मंडपांविरोधात पालिकेची कारवाई सुरू, गणेश मंडळांकडून संताप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

परवानगी न घेता उभारण्यात आलेल्या मंडपांविरोधात पालिका प्रशासनाने कारवाई सुरू केली असून अशा मंडळांना सजावटीचे काम थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे या मंडळांकडून पालिका प्रशासनाविरोधात प्रचंड संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, अवघ्या दोन दिवसांवर गणेशोत्सव आल्यामुळे शिल्लक मंडप परवानग्यांबाबत तोडगा काढण्यासाठी उद्या 10 सप्टेंबर रोजी महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

मुंबई महापालिकेकडे या वर्षी मंडप परवानगीसाठी 3499 इतके विक्रमी अर्ज आले. यापैकी विविध अटींची पूर्तता केली नसल्यामुळे तब्बल 281 मंडळांना पालिकेने परवानगी नाकारली आहे. या वर्षी पालिकेने पहिल्यांदाच ऑनलाइन पद्धतीने परवानगी देण्यास सुरुवात केल्यामुळे हा गोंधळ उडाल्याचे मंडळांचे म्हणणे आहे, मात्र अवघ्या दोन दिवसांवर गणेशोत्सव आल्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांची सजावटीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. असे असताना पालिका प्रशासनाकडून मात्र परवानगी नसलेल्या मंडपांवर कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे उत्सव कसा साजरा करणार असा प्रश्न मंडळांना पडला आहे.

पालिकेच्या कारवाईविरोधात मंडळांनी गणेशोत्सव समन्वय समितीकडे तक्रारी करण्यास सुरुवात केली आहे. एकटय़ा ‘आर-उत्तर’ विभागात अशा 10 मंडपांना काम थांबवण्याचे आदेश पालिकेने दिले असल्याचे समन्वय समितीचे सेक्रेटरी विनोद घोसाळकर यांनी सांगितले.

रद्द परवानग्यांबाबत पुनर्विचार करा!
मंडप परवानगीसाठी पालिकेने दिलेल्या अटींची पूर्तता केली नसल्यामुळेच संबंधित मंडळांना परवानगी नाकारण्यात आल्याचे पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे, तर परवानगी नाकारलेल्या मंडळांमध्ये वर्षानुवर्षे गणेशोत्सव साजरा करणाऱया मंडळांचा समावेश असून केवळ तांत्रिक बाबींमुळे परवानगी नाकारणे योग्य नसल्याचे समन्वय समितीचे म्हणणे आहे. त्यामुळे रद्द परवानग्यांबाबत पालिकेने पुनर्विचार करावा असे समन्वय समितीचे सेक्रेटरी विनोद घोसाळकर यांनी सांगितले. पालिकेने मंडपांवरील कारवाई थांबवावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.

मंडप परवानग्यांबाबत उच्च न्यायालयाचे आदेश आणि फायर ब्रिगेडच्या अटींबाबत पालिकेला आक्षेप असले तरी याबाबत पालिकेने स्वतः पुढाकार घेऊन मंडळांशी समन्वय साधून तोडगा काढला पाहिजे. सर्व मंडळांना गणेशोत्सव साजरा करण्यासाठी परवानगी मिळालीच पाहिजे.
-अॅड. नरेश दहीबावकर, अध्यक्ष, गणेशोत्सव समन्वय समिती

summary- BMC started action against ganesh mandaps without permission